Wednesday, 4 August 2021

कार्यपध्दतीत सकारात्मक बदलांच्या अंगीकाराने औद्योगिक आरोग्य जपले जाणार– मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत


 


नवी दिल्ली ,: सरकारी व खाजगी क्षेत्रातील कार्यस्थळी असलेल्या रूढ कार्य पध्दतीत परिवर्तन होणे आवश्यक आहे. तसेच, कर्मचारी-कामगारांनी जीवनशैलीत सकारात्मक बदल करून उत्तम मानसिक आरोग्य राखल्यास, सृजनशीलता व उत्पादकता वाढेल व पर्यायाने औद्योगिक व सामाजिक आरोग्य जपले जाईल,असे मत मानसशास्त्रज्ञ डॉ. वृषाली राऊत यांनी आज व्यक्त केले.

            महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत औद्योगिक मानसशास्त्र विषयावर ४८ वे पुष्प गुंफताना डॉ राऊत  बोलत होत्या.

            औद्योगिकीकरणामुळे वाढलेली स्पर्धा व त्यातून निर्माण झालेले शारीरिक व मानसिक आजार हे उद्योग क्षेत्रासमोर मोठे संकट असतानाच, कोविड महामारीने यात भर टाकली आहे.परिणामी, जगात व भारतातही सरकारी व खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी- कामगारांमध्ये ताण, चिंता, औदासिन्य, व्यसनाधीनता आणि कोविडोत्तर मानसिक समस्या दिसू लागल्या आहेत. कार्यस्थळी असलेली रूढ कार्यपध्दती व कर्मचारी-कामगारांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळेही यात भर पडत आहे. अशात कार्यस्थळी असणाऱ्या कार्य पध्दतीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी  कमगारांच्या आरोग्याच्यादृष्टीने उपयोगी ठरतील व त्यांचे मनोधैर्य उंचावेल असे कायदे करण्याची गरज असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.

            महाराष्ट्र पुरोगामी राज्य असून अनेक चांगल्या उपक्रमांची सुरुवात महाराष्ट्रात झाली. १८८० मध्ये कामगार चळवळीचे अग्रणी नेते नारायण लोखंडे यांनी कामगारांसाठी देशात पहिल्यांदा साप्ताहिक सुटीची मागणी केली. १९२० मध्ये देशातील पहिली ट्रेड युनीयनही महाराष्ट्रातच सुरु झाली. राज्यात अनेक उद्योग भरभराटीस आले. माहिती तंत्रज्ञान,ऑटोमोबाईल,अन्न प्रक्रिया आदी उद्योगांचा यात समावेश आहे. देशातील मोठया लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्राला  कोविड महामारीमुळे मोठा फटका बसला आहे. सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचारी-कामगारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरही परिणाम झाल्याचे डॉ. राऊत यांनी अधोरेखित केले.

             औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेली स्पर्धा व कामाच्या ठिकाणच्या रूढ कार्यपध्दतीमुळे गेल्या दशकात मानसिक आजार वाढले. कामगारांमध्ये  ताण, चिंता,औदासिन्य,व्यसनाधीनता दिसू लागली. २०१८ मध्ये बेंग्लुरु येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कामगारांच्या औदासिनतेमुळे व ताण-तणावामुळे कंपन्यांना दरवर्षी २५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे संशोधनात पुढे आल्याचे डॉ. राऊत यांनी यावेळी नमूद केले.

            अपुऱ्या झोपेमुळे कामगारांच्या उत्पादकतेत व सृजनशीलतेत घट होऊन मानसिक आजार बळावल्याची माहिती  समोर आली आहे. १८ देशांमध्ये यासंदर्भात झालेल्या अभ्यासानुसार भारत दुसऱ्या क्रमांकावर  असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इंटरनेटच्या वापरामुळे माहिती आधिक्याने कामगारांच्या शारीरिक व बौध्दिक आरोग्यावर वाईट परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० ते १५ वर्षांत कामगारांमध्ये  बर्नआऊट  ही मानसिक अवस्था  निर्माण झाल्याचेही डॉ. राऊत म्हणाल्या.  

                 आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या माहितीनुसार जगात १९३० मध्ये आलेल्या महामंदीची तीव्रता आज कोविड महामारीत जग अनुभवत आहे. आजच्या परिस्थितीत कोविड महामारीमुळे औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या कार्य पध्दतीत बदल झाले. त्याचे सामाजिक परिणामही दिसू लागले आहेत. कोविड आजारातून बाहेर पडल्यानंतरही कामगारांमध्ये पोस्ट प्रोमॅटीक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) हा ताणाचा आजार निष्पन्न झाल्याचे त्यांनी सांगितले. 

                  सध्याची परिस्थिती पाहता कर्मचारी-कामगारांनी जीवनशैलीत्मक बदल घडवून आणण्याची व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी  सूर्यप्रकाश घेणे, व्यायाम करणे, वाचन करणे, इंटरनेटचा मर्यादित वापर करणे व  पुरेशी झोप  घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

                   सरकारी व खाजगी क्षेत्रात कार्यरत कर्मचारी व कामागारांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम पाहता सरकारने याबाबत काही नियम बनविणे गरजेचे आहे. त्यासाठी अन्य देशांचा अभ्यास करून व तज्ज्ञांच्या मदतीने महाराष्ट्र शासनाने पाऊल उचलले तर औद्योगिक क्षेत्रात पुढे असलेले प्रगत राज्य अशा ओळखीसह वैज्ञानिकदृष्टया कार्य करणारे औद्योगिक राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख  निर्माण होईल व कर्मचारी -कामगारांचे मनोधैर्य उंचावेल अशा भावनाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केल्या.                                                      

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा: http://twitter.com/micnewdelhi                                                                                          

                                                                    ०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१५९/ दिनांक ०४.०८.२०२   

 

    

 

 

 

                    

 


No comments:

Post a Comment