Thursday, 5 August 2021

संत शेख महंमदांनी मराठी मातीत धार्मिक सद्भावनेचे विचार रूजविले–प्रा. उमेश सुर्यवंशी


 नवी दिल्ली ,५ : संत ज्ञानेश्वरांचा विश्वात्मकदृष्टीकोनाच्या आणि संत कबिरांच्या एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या संत शेख महंमद यांनी मराठी मातीत धार्मिक सद्भावनेचे विचार रूजविण्याचे बहुमूल्य कार्य केले ,असे मत प्रा. उमेश सुर्यवंशी यांनी आज व्यक्त केले.

          धार्मिक सद्भावना जपणारे संत शेख महंमद या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत ४९ वे पुष्प गुंफताना प्रा. सुर्यवंशी बोलत होते.

          लोपपावत चाललेल्या मानवतेच्या काळात संत शेख महंमदांनी समानतेला खतपाणी घालण्याचे महत् कार्य केले.आपल्या साहित्यातून अंधश्रध्दा व अनिष्ट प्रथांवर प्रहार करून त्यांनी अज्ञानी समाजात वैज्ञानिकदृष्टीकोण रूजविण्याचे कार्य केले. त्यांनी वारकरी संप्रदाय व सुफी संप्रदायांचा अभ्यास करून समतेचे विचार मांडले. तसेच, कुराण आणि पुराणांचे तत्वज्ञान व कार्य एकच आहे, अशा समतेच्या विचारांचा प्रसार केला, असे प्रा. सुर्यवंशी म्हणाले.

                         मराठवाडयातील धारूर येथे संत शेख महंमद यांचा जन्म झाला.अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा हे  त्यांचे  मूळ गाव तर त्यांचे मूळचे मुस्लिम घराणे हे बीड जिल्हातील पूण्यवाहिरे येथील आहे. या तिन्ही  ठिकाणी शेख महंमदांची उपासना श्रध्दा  व भक्तीभावाने केली जाते. हिंदूलोक इथे पारायण, भजन, कीर्तन करतात तर मुस्लिम लोक प्रार्थना व कुराणाचे पठन करतात. याठिकाणी हिंदू-मुस्लीम एकत्र येतात या स्थानाला कोणी दर्गा तर कोणी मंदिर म्हणतो. ही स्थळे मानवतेची व धार्मिक सद्भावनेची उत्तम उदाहरणे असून भारतासह जगाला संत शेख महंमदांनी दिलेल्या विचारांचे प्रतीक असल्याचे, प्रा. सुर्यवंशी यांनी नमूद केले. 

                गुरु चांद बोधले यांनी संत शेख महंमदांना ज्ञानेश्वरी ग्रंथाची प्रत दिली आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ज्ञानेश्वरीने त्यांच्या मनावर अध्यात्माचा शुध्द संस्कार केला. त्यांच्या साहित्यात ज्ञानेश्वरीतील प्रतिमा, प्रतीक पदोपदी दिसून येतात. कुराण आणि पुराणांचे कार्य एकच आहे हा गुरुंकडून मिळालेला समतेचा विचार संत शेख महंमदांनी महाराष्ट्रात सर्वदूर पोह‍चविण्याचे कार्य  केले, असे प्रा. सुर्यवंशी यांनी सांगितले.

         जेथे जेथे परब्रह्म,  तेथे तेथे माझी भक्ती’’ हा संत कबिरांचा एकेश्वर वादाचा पुरस्कार करण्याचे व कबिरांचे विचार जनसामान्यांपर्यत पोहचविण्याचे कार्य शेख महंमदांनी केले. सच्चा पीर कहे मुस्लमान, मराठे म्हणती सद्गुरुपूर्ण , पण दोन्हीत नाही भिन्नत्वपण, आखे खोलो देखो भाई . अशा शब्दात त्यांनी हिंदु- मुस्लिम धर्म एकच आहे हा समानतेचा विचार मांडला.

               समाजातील अनिष्ट रूढी -परंपरेवर त्यांनी कठोर टीका केली व समाजाचे प्रबोधन केले. अविनाशी साही दर्शनाची सोंगे पाखंडयांनी घेतली अनेक अशा परखड शब्दात टीका करत विवेक बुध्दीने गुरु करण्याची शिकवण शेख महंमदांनी दिली. मूर्ख लोक नवस करती देवांप्रती आणि मागती धनसंपत्ती’’. असे सांगून त्यांनी अज्ञानी लोकांमध्ये ज्ञानाचे अंजन घालण्याचे व विज्ञाननिष्टदृष्टीकोण रूजविण्याचे कार्य केले.

                संत शेख महंमद आणि संत तुकाराम हे समकालीन आहेत. त्यांच्या भेटीचे अनेक दाखले आहेत. एकाबाजुला वारकरी संप्रदायाशी त्यांचे नाते आहे तर दुसरीकडे सुफी संप्रदायाशीही त्यांचे नाते आहे. या दोन्ही संप्रदायाचा अभ्यास करून त्यांनी उभय संप्रदायांचे तत्वज्ञान एकच असल्याचे पटवून देत समाजाला समतेचा मार्ग दाखविला.

                संत शेख महंमदांनी समता, विवेकवाद आणि एकेश्वरवादासाठी केलेले कार्य आदर्शवत आहे. त्यांनी  लिहीलेल्या निष्कलंक प्रबोध, योगसंग्राम आणि पवन विजय या ग्रंथाच्या व स्वरचित भारुड, अभंग या माध्यमातून त्यांनी समाजाला हितोपदेश केला व समानतेचा संदेश दिलेला आहे. वर्तमान स्थितीत समाजामध्ये संत शेख महंमदांच्या समतेच्या व मानवतेच्या विचारांचा प्रसार व्हावा व हाच विचार संपूर्ण जगात पसरावा, असा आशावाद प्रा. सुर्यवंशी यांनी  व्यक्त केला.   

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा: http://twitter.com/micnewdelhi                                                                                          

                                                                    ०००००

रितेश भुयार /वृत्त.वि. क्र.१६१/ दिनांक ०५.०८.२०२ 

No comments:

Post a Comment