Thursday, 23 September 2021

महाराष्ट्राचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी नवे वायुदल प्रमुख


नवी दिल्ली, २३ :  नांदेड जिल्हयाचे सुपुत्र एअर मार्शल विवेक चौधरी हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय वायुदलाचे प्रमुख  म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.

              संरक्षण मंत्रालयाने देशाचे नवे वायुदल प्रमुख म्हणून विद्यमान उपप्रमुख एअर मार्शल विवेक चौधरी यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदोरिया हे ३० सप्टेंबर २०२१ रोजी सेवानिवृत्त होत असून  एअर मार्शल चौधरी  त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारतील.

               एअर मार्शल विवेक चौधरी हे मुळचे नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी  नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले  व पुढे  पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतून शिक्षण पूर्ण करून २९ डिसेंबर १९८२ रोजी वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.

              वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी एअर मार्शल विवेक चौधरी यांनी  लडाखसह उत्तर भारतातील हवाई हद्दीची जबाबदारी असलेल्या वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात  त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या  सांभाळल्या आहेत. मिग आणि सुखोई ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.                

  आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                            00000

वि.वृ.क्र.201/दि. 23.09.2021 

 



 

No comments:

Post a Comment