Thursday, 21 October 2021

‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान


 

            

नवी दिल्ली, २१ : मुख्यमंत्री  कृषी वाहिनी  योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती कंपनीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते इंडिया ग्रीन एनर्जी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

              केंद्रीय नवीन व नवी करणीय ऊर्जा मंत्रालयाशी संलग्न इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या संस्थेच्यावतीने बुधवारी आयोजित कार्यक्रमात इंडिया ग्रीन एनर्जी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय नवीन व नवी करणीय ऊर्जा  राज्यमंत्री  भगवंत खुबा, इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी यावेळी उपस्थित होते. या समारंभात उत्कृष्ट पर्यावरणपूरक हरित ऊर्जा प्रकल्पाचा पुरस्कार महानिर्मिती कंपनीला प्रदान करण्यात आला. महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

              शेतकरी आणि शेती’  यास केंद्रबिंदू धरत राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनासुरु केली. राज्यशासनाच्या महानिर्मिती कंपनी मार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेंतर्गत सौर उर्जेद्वारे विद्युतीकरण करून पारंपारिक उर्जेची बचत होत आहे व पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मितीही होत आहे. शेतीसाठी  ही  योजना प्रभावी ठरत असून पर्यावरण समृद्धीही  साधली जात आहे. सौरऊर्जेचा वापर करून शेती सुजलाम-सुफलाम करण्याच्या राज्य शासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ऊर्जा आणि कृषी विकासालाही  नवा आयाम मिळत आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

                                                                    00000

रितेश भुयार /वि.वृ.क्र.२१५ /दि. २१.१०.2021

 

             

 

No comments:

Post a Comment