Thursday, 10 February 2022

महाराष्ट्राच्या खारफुटी जंगल संवर्धन आणि संरक्षणाची केंद्राकडून दखल



नवी दिल्ली , 10 : खारफुटीजंगलांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या महत्वपूर्ण उपाययोजनांचे आज केंद्रीय पर्यावरण,वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी संसदेत कौतुक केले.

केंद्रशासनाकडून देशातील जंगल संवर्धन व संरक्षणासाठी होत असलेल्या कार्याची माहिती श्री चौबे यांनी राज्यसभेत दिली, त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या खारफुटी जंगल संवर्धनाच्या कार्याचे विशेष कौतुकही त्यांनी केले. महाराष्ट्र सरकारने खारफुटीच्या संवर्धनासाठी अनेक सक्रीय पावले उचलली आहेत. खारफुटी संवर्धनासाठी राज्याने ‘समर्पित खारफुटी विभागा’ची स्थापना केली आहे.‘कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान’ स्थापन करून राज्यात खारफुटीचे आच्छादन वाढविण्याचे तसेच, वन विभागांतर्गत संशोधन व उपजीविका उपक्रमांना चालना देण्याचे कार्य होत असल्याचेही श्री चौबे यांनी सांगितले.

‘खारफुटी आणि प्रवाळ खडक संवर्धन व व्यवस्थापन’ या राष्ट्रीय किनारी अभियान कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेद्वारे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या कार्यक्रमांतर्गत वार्षिक व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्यात येतो आणि सर्व किनारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही श्री चौबे यांनी सांगितले.

‘वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया’च्या माहिती नुसार, या संस्थेद्वारे ‘मॅजिकल मँग्रोव्हज’ मोहिमेच्यामाध्यमातून खारफुटी संवर्धन विषयक साक्षरतेसाठी महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही श्री. चौबे म्हणाले.
0000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
रितेश भुयार /वि.वृ.क्र. 28/ दि.10.02.2022

No comments:

Post a Comment