Saturday, 26 February 2022

विशेष लेख- माझी “माय मराठी”


          जन्मापासूनच आपल्या आईपासून दूर जावे.... कुणातरी दुसऱ्या स्त्रीच्या मायेच्या उबेत वाढावे आणि तिलाच आपण आपली आई म्हणून नकळत स्वीकारावे, आई म्हणून प्रेमाने हाक मारावे, तसेच माझे मराठी भाषेबाबत झाले आहे.

        तशी मी शीख कुटुंबातली.. वाडवडील महाराष्ट्रात आले, पुण्यात स्थायिक झाले. तिथेच माझा जन्मही झाला. जन्मत:च अवतीभवती मराठी भाषिक मित्र, मैत्रिणी... शिक्षणही पुण्यातच.  सहजच मराठी भाषेच्या जवळ आले.. एकरुप झाले माझी माय मराठी असे होऊन बसले.

       घरात आई-बाबा पंजाबी बोलायचे, सिंधी बोलायचे.. बाबा अस्खलित मराठीही  बोलायचे. त्यामुळे कानावर तीही भाषा पडायचीच... पण मनात मूळ मात्र मराठी भाषेने धरले. मराठी, इंग्रजी, हिंदी, पंजाबी, सिंधी, तसेच जर्मन या सहाही भाषा मला आज अवगत आहेत.  पण अधिक गोडी कुणाची असेल तर माय मराठीची. 

    भारत हा बहुभाषिक देश आहे.  प्रांताप्रांतात भाषा वेगळया.  एवढेच काय महाराष्ट्रातही वेगवेगळया भागात मराठीही वेगळया अंगाने, वेगळया ढंगाने बोलली जाते. आपले वास्तव्य जिथे आहे तिथली भाषा किमान संवादापुरती तरी आपल्याला आलीच पाहिजे.  त्यामुळे एकतर तिथल्या माणसांशी तुमचा सुसंवाद होतो, संवादातून मैत्री होते, संवादामुळे अवघड कामे सोपी होतात.  माझ्या भावांनाही मराठी येते, म्हणून त्यांना पुण्यात व्यवसाय करणे अधिक सुलभ होते. त्या त्या प्रांताच्या भाषेत बोलले की तिथल्या लोकांनाही क्षणात आपल्याविषयी आपुलकी निर्माण होते, हा त्याचा विशेष लाभ आहे.

         पुण्यातच शिक्षण आणि तरुणाईचा काळ गेल्याने बोलण्यात सहजच पुणेरी शुध्द मराठी उतरली.  शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीसाठी प्रयत्न सुरु झाले.  महाराष्ट्र शासनाच्या मुख्यालयात एका पदावरील नियुक्तीसाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहिली.  त्यात एक मराठी भाषेचा पेपर अनिवार्य.. ती अडचण आली नाही... पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णही झाले.  मराठी बोलीभाषा येत होतीच.  मराठी प्रशासकीय भाषा देखील शिकायला मिळाली.

 लग्न दिल्लीत झाले. पुढे, कौटुंबिक कारणास्तव मुंबईत काम करू शकत नव्हते.  चार पदे खाली उतरून, एका कनिष्ठ पदावर रुजू झाले. असो.

हार मानली नाही…. पत्रकारितेचाही अभ्यासक्रम पूर्ण केला, मुख्यालयाची परिक्षा उत्तीण केली आणि शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात, माहिती अधिकारी म्हणून रुजू झाले. आज, जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असून, सोबतच, उपसंचालक पदावरचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत आहे.

 मराठीत बोलणे, मराठी साहित्य वाचणे, मराठीत राज्याच्या विकासाचा आलेख जनतेसमोर ठेवणे हे सर्व सहज आवडीचे होऊन बसले आहे.

 

पहिली ती माता

माझी जन्मदात्री,

दुसरी धरित्री

माता माझी.

तिसरी ती माझी

भारत हो माता,

चवथी ती आता

मराठीच.

 

               असे होऊन बसले आहे खरे.

         आता देशाच्या राजधानी दिल्लीत बसून माझ्या मराठीच्या यशाचा, विकासाचा ध्वज अभिमानाने माझ्या समस्त मराठीभाषिक बांधवांच्या सहाय्याने मी फडकवत ठेवते आहे, याचा खूप आनंद होतो.

          माझ्या अमराठी बांधवांना मी अनुभवाने सांगते की, इतर सर्व भाषा त्यांच्या त्यांच्या परीने श्रेष्ठ असल्या तरी, सर्व भाषांत मराठी इतकी सुंदर, वैविध्यपूर्ण आणि स्वादाने गोड भाषा नाही.  तेव्हा तुम्ही जरुर बोलायचा प्रयत्न करा....शिकायचा प्रयत्न करा. मी माझ्या मुलांसोबत मराठीत बोलते. दोघांना समझते ही. कधी कधी ते उत्तरही मराठीत देतात. छोट्या मुलाला नवीन भाषा शिकण्याची हौस असल्याने, तो आवर्जून मराठीत बोलतो. असो

   ओवी, अभंग, लावण्या, कथा, कादंबऱ्या, कविता, भारुड अशा विविध साहित्यिक रुपात नटलेली, व्यक्त झालेली ही माझी माय मराठी मला खूप प्रिय आहे.

      शारदेच्या दरबारात तर तिला अग्रस्थान आहेच. पण राजदरबारातही तिला राजभाषा म्हणून मान मिळावा यासाठी आपले मा.मुख्यमंत्री महोदय, मराठी भाषा विभागाचे माननीय मंत्री, राज्याचा मराठी भाषा विकास विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि आपण सर्वच प्रयत्नशील आहोत.  राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग व केंद्राचा संबंधित विभाग यांच्यात यासंदर्भात समन्वयाचे काम मला करायला मिळते आहे, हे माझे भाग्य आहे.  हा राजभाषेचा सेतू बांधला गेलाच तर खारुताई होण्याचे भाग्य वाटयाला येईल, तो क्षण लवकरच येवो.

  माय मराठीला त्रिवार वंदन आणि आपणा सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा !


अमरज्योत कौर अरोरा,उपसंचालक (मा) (अ.का)महाराष्ट्र परिचय केंद्र,नवी दिल्ली.           

                           ***************************

आमच्या ट्विटर हँडलला फॉलो करा : https://twitter.com/MahaGovtMic  

 


No comments:

Post a Comment