Wednesday, 9 February 2022

समीर कुमार बिस्वास महाराष्ट्र सदनाचे नवे निवासी आयुक्त


 

नवी दिल्ली , 9 : महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून समीर कुमार बिस्वास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडून त्यांनी  निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे.

             समीर कुमार बिस्वास हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून केंद्रीय रसायने व खते मंत्रालयात ते अपर सचिव पदावर कार्यरत होते. श्री. बिस्वास गेल्या सात वर्षांपासून  प्रतिनियुक्ती तत्वावर केंद्र  शासनाच्या  सेवेत कार्यरत होते. मागील ३१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये विविध महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.  

          श्री. बिस्वास यांनी वर्ष २००० ते २०१२ पर्यंत  महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे तसेच राज्य आर्थिक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक, जनगणनना प्रकल्पाचे संचालक आदि पदांवर कार्य केले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळात कार्यरत असतांना त्यांनी  मुंबई ट्रांस हर्बर लिंक सह अनेक महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीत उल्लेखनीय जबाबदारी  पार पाडली आहे.

            वर्ष २०१२ ते २०१४ या कालावधीत त्यांनी मुंबई येथील  धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

               दरम्यान, श्री. बिस्वास यांनी  महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योतकौर अरोरा यांनी श्री. बिस्वास यांची सदिच्छा भेट घेतली.

                                                                0000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

रितेश भुयार /वि.वृ.क्र. 26/ दि.9.02.2022


No comments:

Post a Comment