Thursday 18 August 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शहीद जवानांना श्रध्दांजली राष्ट्रीय युध्द स्मारकाला दिली भेट





 नवी दिल्ली दि. 18 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राष्ट्रीय युध्द स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली.

येथील इंडिया गेट परिसरात स्थित ‘राष्ट्रीय युध्द स्मारका’स राज्यपालांनी भेट दिली. एअर कोमोडोर सुनिल तोमर यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे आणि भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यपांलानी राष्ट्रीय युध्द स्मारकाच्या केंद्रस्थानी स्थित ‘अमर जवान ज्योतीला’ पुष्पचक्र अर्पण करून भारत देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले की, १९६२ च्या भारत-चीन युध्दात शहीद झालेल्या आपल्या बहिणीच्या पतिची (भाऊजी) प्रकर्षाने आठवण झाली. शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खाप्रती सद्भाव व्यक्त करतानाच त्यांच्या कुटुंबाविषयी गर्व वाटतो, असे राज्यपालांनी म्हटले आहे. देशासाठी युध्द भूमीवर शहीद झालेल्या वीर जवानांवर देशाला गर्व असून ‘राष्ट्रीय युध्द स्मारक’ हे पाचवे धाम म्हणून देशाच्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल, असेही राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, राज्यपालांनी बुधवारी (दि.१७ ऑगस्ट) नवनियुक्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची उपराष्ट्रपती निवास येथे सदिच्छा भेट घेतली. तसेच,माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची १२,जनपथ या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000
रितेश भुयार / वृत्त वि. क्र. १३६ / दिनांक १८.०८.2022

No comments:

Post a Comment