“वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” मेळयाची मध्यवर्ती संकल्पना
14 नोव्हेंबर रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र दालना’ चे उद्घाटन
नवी दिल्ली, 12 : ‘महाराष्ट्र दालन’ भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळया (आयआयटीएफ) साठी सज्ज होत आहे. यावर्षी महाराष्ट्राला ‘भागीदार राज्य’ होण्याचा मान मिळाला आहे. “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित यंदाचा व्यापार मेळा असणार आहे. या मेळयातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी दि. 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.00 वा. होणार आहे.
दि. 14 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान प्रगती मैदान येथे 41 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना “वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” अशी आहे. महाराष्ट्र याच संकल्पनेवर आपल्या विकासाचे दर्शन घडविणारे प्रदर्शन साकारत आहे. याच मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित मेळ्यात देशातील सर्व राज्ये आपापल्या राज्याच्या प्रगतीचे दर्शन घडवणार आहेत.
“वोकल फॉर लोकल, लोकल टू ग्लोबल” ही संकल्पना मांडताना डिजिटल, ई-तंत्रज्ञान क्षेत्रातील विकास, निर्यात, लघुउद्योग, उत्पादन समूह केंद्र(क्लस्टर), स्टॉर्टअपला चालना देणारे धोरण, यासह इतर विषयांचे आकर्षक प्रदर्शन महाराष्ट्र दालनात दिसणार आहेत. एकूण 45 स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्र शासनाचे तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाअंतर्गत येणारे निवडक विषयांवर स्टॉल्स राहतील. यासह बचत गटांचे, कारागिरांचे, सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगातंर्गत येणारे उद्योग समूह (क्लस्टर) चे आणि स्टॉर्टअप चे स्टॉल्स असणार आहेत.
महाराष्ट्र दालन यावर्षी हॉल क्रमांक 2, तळमजल्यावर मांडण्यात आले आहे. प्रगती मैदान येथील गेट क्रमांक 4, मधून प्रवेश आहे. महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी उद्योग व खणन विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, लघुउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे, सनदी अधिकारी आदी उपस्थित राहतील.
आयआयटीएफच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार 41 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयाच्या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन 14 नोव्हेंबरला सायंकाळी 4.00 वाजता केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र भागीदार राज्य असल्याने मुख्य कार्यक्रमात राज्याचे उद्योग मंत्री श्री सामंत उपस्थित राहतील. |
महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यक्रम ‘महाराष्ट्र दिवस’ 26 नोव्हेंबरला सायंकाळी 5.30 वाजता एम.पी. सहभागृहात होईल.
00000
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
अंजु निमसरकर /वृत विशेष क्र. 171 दि. 12. 11.2022
No comments:
Post a Comment