Tuesday, 17 January 2023

पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 



व्हिजन 2047 : शिखर संमेलनात संबोधन

नवी दिल्ली, 17 : न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

येथील विज्ञान भवन येथे लवचिकता आणि सातत्य -  शिखर  संमेलन : दृष्टी 2047’ (रिसायलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हिजन 2047)  या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यावतीने या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक डॉ. शोंबी शार्प, यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री मुनगंटीवार यांनी सांगितले ते वनमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करीत असतांना राज्याच्या महसुलात 11 हजार 975 कोटीं रूपयांची  विक्रमी वाढ केली. याच काळात महाराष्ट्राने तब्बल 50 कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम केला. ज्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. सद्य:स्थितीत राज्यात 6.1 दशलक्ष ‘ग्रीन आर्मी’ कार्यरत आहे. देशाच्या सैन्यदलापेक्षाही ही संख्या मोठी असल्याचा अभिमान वाटतो, असे ते याप्रसंगी म्हणाले. वनमंत्री म्हणून पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचा प्रयत्न केला असून त्यात ब-याच अंशी यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मुनगंटीवार पुढे म्हणाले, पर्यावरणीय बदलांमुळे पूर्वीसारखा पाऊस आता पडत नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. दरवर्षी या हानीमुळे राज्य सरकारला सरासरी 10 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागते. पर्यावरण संतुलन राखने गरजेचे सांगुन, त्यामुळे पर्यावरणीय बदल थोपविता येतील. हे लक्षात आल्यामुळे वनसंपदा वाढवून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याशिवाय हे कार्य व्यापक जनचळवळी स्वरूप येणार नाही, त्यामुळे स्वत: पुढाकार घेत संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनाची जनचळवळ उभारण्यासाठी प्रामाणिक योगदान देण्याचे काम केले. त्याचा सकारात्मक परिणामही दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

वनमंत्री असताना सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेला व्यापक यश मिळाले. पूर्वी वनक्षेत्राच्या बफर झोनमध्ये गावे तयार नसायची. या उलट आता ग्रामस्थांची निवेदन येतात, त्यांच्या गावाला या योजनेचा लाभ मिळावा. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. अशा कार्यातून आणखी मोठा टप्पा गाठायचा असल्याचे श्री मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.

मानव वन्यजीव संघर्षावरील उपायांबाबत सांगताना मुनगंटीवार म्हणाले, जगातील सर्वाधिक 203 वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. पूर्वीच्या तुलनेत  वाघांची संख्या वाढतच आहे. त्यांची प्रजनन क्षमतेत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनक्षेत्रालगतच्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी रोजगारांची निर्मिती करण्यात येत आहे, ज्यामुळे  ग्रामस्थांना उपजीविकेसाठी जंगलात जाण्याची गरजच पडणार नाही, असे ही श्री  मुनगंटीवार यांनी सांगितले.

जलसाक्षरतेचा उपक्रम महाराष्ट्रात व्यापक प्रमाणावर सुरू आहे. जल, जमीन आणि जंगल यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनमंत्री म्हणून आपण फक्त आपले कर्तव्य निभावत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. महाराष्ट्राने घेतलेला या सकारात्मक पुढाकाराचा कित्ता भविष्यात सगळेच गिरवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment