Tuesday, 17 January 2023

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार



  

नवी दिल्ली, 17 : गोडया पाण्यातील मत्स्यपालन करण्यासाठी प्रशिक्षक मनुष्यबळ तयार व्हावा, यासाठी प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूर येथे उभारण्याची मागणी,  राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे केली.

            महाराष्ट्राला 720 किलो मिटरचा सागरी किनारा लाभला आहे. यासह राज्यात गोडया पाण्यातील अंतर्देशीय मासेमारी मोठया प्रमाणात होते.  विदर्भात सर्वाधिक गोडया पाण्यात मासेमारी केली जाते. सद्या विदर्भात एकही संशोधन केंद्र नाही. त्यासाठी चंद्रपूर येथे प्रादेशिक संशोधन  केंद्र उभारावे, अशी मागणी      श्री मुनगंटीवार यांनी केली.

केंद्रीय मंत्री श्री रूपाला यांच्या अध्यक्षतेत सागर परीक्रमा योजनेची आढावा बैठक सोमवारी घेण्यात आली. त्या बैठकीत श्री मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देऊन मागणी केली.

              विदर्भात तळी, मालगुजरी तळी, शेत तळी आदी असे एकूण 30,650 तळी आहेत. यात 1, लाख 87 हजार 249 हेक्टर  पाण्याचे क्षेत्र आहे. यातील 50 % टक्के तळयात मासेमारी केली जाते.

            चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्व आणि दक्षिण सीमेला वैनगंगा लागून आहे तर  पश्चिम सीमेला वर्धा नदी आहे. याठिकाणी 5,547 जल समिती (वॉटर बॉडीस) असून 25,429 हेक्टर पाणी क्षेत्र आहे. यामधील  29% टक्के तळी मत्स्यव्यवसायासाठी वापरले जातात तर 20% टक्के तळी हे शेत तळे  आहेत.

            देशातील इतर भागात ज्याप्रमाणे गोडया पाण्यातील मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारली आहेत, त्याच धर्तीवर चंद्रपूरमध्येही असे संशोधन केंद्र उभारण्यात यावे. यामुळे गोडया पाण्यातील मच्छीमारांचा जलदगतीने विकास होऊ शकेल. माश्यांचे बीजपुरवठाअद्यावत तंत्रज्ञानाची माहिती ही प्रशिक्षणाव्दारे देऊन कौशल्य विकास करता येईल.


            शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मासेमारी जोडधंदा  म्हणून अधिक उपयोगी ठरत आहे. विदर्भात मत्स्यबीज समुह केंद्राला (फिश सीड क्लस्टर) वाव आहे. भारतीय कृषीसंशोधन परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरच्या समन्वयाने चंद्रपूर येथे  प्रादेशिक संशोधन केंद्र उभारावे अशी मागणी निवेदनात नमुद आहे.

No comments:

Post a Comment