राष्ट्रपती
यांच्या हस्ते आज पुरस्काराचे वितरण
नवी दिल्ली, 22 : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थवृत्तीने सेवा
देणाऱ्या आणि शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या
सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांचा
आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल
पुरस्कार प्रदान करून गौरवण्यिात आला. याप्रसंगी 2022 आणि 2023 च्या पुरस्कारांचे
वितरण करण्यात आले. यात 2022 मध्ये
महाराष्ट्रातील 1 आणि वर्ष 2023 मध्ये
2 परिचारिकांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने आज
राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार वितरण सोहळ्याचे
आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री एस.पी.सिंग बघेल विभागाचे सचिव राजेश भुषण
यांच्यासह वरिष्ठ अधिकारी वर्ग, आरोग्य
क्षेत्रात काम करणारे व्यक्ती उपस्थित होते.
यावेळी वर्ष 2022 मध्ये 15 आणि वर्ष 2023 मध्ये 15 असे एकूण 30 परिचारिका आणि
परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण करण्यात
आले. वर्ष 2022 मध्ये मिळालेल्या
पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातून पालघर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, निर्मल उपकेंद्र, भुईगांव येथील
सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, वर्ष 2023 मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातून चंद्रपूर
जिल्ह्यातील जिल्हा रूग्णालयाच्या
सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा श्रावण पोडे आणि दक्षिण कमांड (वैद्यकीय ) मुख्यालय पुण्याच्या
ब्रिगेडियर एम.एन.एस.अमिता देवरानी यांचा समावेश आहे.
सुजाता पीटर तुस्कानो यांचा सहायक परिचारिका (एएनएम) म्हणून 35 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी निमवैद्यकीय
क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत अनेकांना आरोग्य सेवा प्रदान केलेली आहे. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील आरोग्याशी विषयक कार्यशाळेत त्या नेहमीच सहभागी होत असत. व्यापक समाजकार्यासाठी यापूर्वी श्रीमती तुस्कानो यांना अनेक पुरस्कार
आणि सन्मानपत्रे देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.
पुष्पा श्रावण पोडे चंद्रपूर जिल्ह्याच्या
जिल्हा रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य परिचारिका म्हणून मागील 21 वर्षांपासून
कार्यरत आहेत. त्या त्यांच्या कामाप्रती अंत्यत वचनबद्ध व मेहनती परिचारिका म्हणून
लोकप्रिय आहेत. श्रीमती पोडे यांनी लक्ष्यपूर्तीसाठी सर्व राष्ट्रीय आरोग्य
कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे. श्रीमती पोडे यांनी दिलेल्या आरोग्य
सेवेतील लक्षणीय योगदानाबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित
केलेले आहे.
ब्रिगेडियर अमिता देवरानी, सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम.
एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. ब्रिगेडियर देवरानी यांनी 37 वर्ष लष्करात परिचारिका
म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. लष्कराच्या दक्षिण
कमांड अंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई
दलाच्या 50 रूग्णालयांचे कामकाज त्या पहातात. कोविड-19 संकटकाळात त्यांनी केलेले
काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर
त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. काँगो
रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत
मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने
त्यांचे विशेष कौतुक केलेले आहे. ब्रिगेडियर देवरानी यांना लष्करी शुश्रुषेसाठी
अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत.
वर्ष 1973 पासून राष्ट्रीय फ्लोरेन्स
नाइटिंगेल पुरस्कारांची सुरूवात करण्यात आलेली आहे. आतापर्यंत एकूण 614 परिचारिका
आणि परिचारक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आलेले
आहेत. पदक आणि प्रशस्ती पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment