Thursday 27 July 2023

09 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात 'मेरी माटी मेरा देश अभियान' राबविण्यात येणार देशातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून तरुण त्यांच्या राज्यातील माती आणतील.

नवी दिल्ली 27 :आझादी का अमृत महोत्सव (AKAM) 12 मार्च 2021 रोजी साबरमती ते दांडी या पदयात्रेने सुरू झाला. आता 'मेरी माटी मेरा देश' मोहिमेची संकल्पना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रम म्हणून करण्यात येणार आहे. या अभियानात ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेणारी बैठक बुधवारी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव श्री शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव श्रीमती मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्य पथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ऑगस्ट 2023 मध्ये होणाऱ्या या मेगा इव्हेंटमध्ये ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमाच्या परिणामी, दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत. ग्रामविकास सचिव, श्री शैलेश कुमार सिंह यांनी वसुधा वंदन आणि शिलाफलकमचे महत्त्व सांगत, प्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वी मातेचे नूतनीकरण करण्याबाबतची माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, वसुधा वंदन कार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळा, ग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल. देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे. 0000000000 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा : http://twitter.com/micnewdelhi अमरज्योत कौर अरोरा /वृत्त क्र.134 / 27.7.2023

No comments:

Post a Comment