Wednesday, 4 October 2023

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती मुर्मूंची भेट

 










नवी दिल्ली, 04: राज्यातील आदिवासी समाजाच्या काही प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्री धर्मराव आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळासह, राष्ट्रपती मुर्मू यांची राष्ट्रपती भवन येथे आज भेट घेतली.

या शिष्टमंडळामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम, सर्वश्री सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, शांताराम मोरे, शिरिषकुमार नाईक, काशिराम पावरा, देवराम होळी, राजेश पाडवी व आमश्या पाडवी यांनी श्रीमती मुर्मू यांना राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत निवेदन सादर केला.

याबैठकीनंतर, श्री झिरवाळ यांनी माध्यमप्रतिनिधींसोबत संवाद साधला व आदिवासी समाजातील ज्या समस्या आहेत त्या हक्काच्या ठिकाणी मांडाव्यात यासाठी दिल्लीत शिष्टमंडळासह दाखल झाल्याचे सांगितले, व राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे श्री झिरवाळ यांनी यावेळी सांगतिले.

 

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व आमदारांनी दिली महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

 

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची सकाळी भेट घेतल्यानंतर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी  सपत्नीक व आमदारांसह महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. त्यांच्यासोबत विक्रमगढ (पालघर)  मतदारसंघाचे आमदार सुनिल भुसारा व इगतपुरी (नाशिक) मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर होते. यावेळी परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 

          श्री. झिरवाळ म्हणाले, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी   दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्राची स्थापना करून महत्वपूर्ण कार्य केले. श्री. चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्थापन झालेल्या या कार्यालयाचे महत्व आजही कायम आहे. या केंद्राच्या माध्यमातून राजधानीत महाराष्ट्र शासनाचे विविध उपक्रम राबविणे, मराठी संस्कृतीचे संवर्धन करणे आदी महत्वपूर्ण कार्य होत असल्याचे समाधान व्यक्त केले. नवमाध्यमांच्या युगात परिचय केंद्रानेही आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करीत असल्याचे पाहून त्यांनी या उपक्रमांचे कौतुक केले.

श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. झिरवाळ यांना दिली. यावेळी  सर्व उपस्थितांना लोकराज्य अंकाची प्रत भेट दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल श्री. झिरवाळ यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

***************


आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.181  / दिनांक 04.10.2023


No comments:

Post a Comment