Friday, 19 January 2024

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शन स्तुत्य उपक्रम मराठी भाषा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन – सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार

 






मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन ग्रंथ विक्री प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी केले.

 

कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे पुस्तक विक्री प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी निवासी आयुक्त डॉ. अडपावार बोलत होते.  ते पुढे म्हणाले की, मराठी भाषेचा राजधानीत प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सारखे विविध  उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राजधानीत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

 

महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत महाराष्ट्र सदन येथे ग्रंथ विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन  करण्यात आले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम, स्मिता शेलार, परिचय केंद्राच्या  उप‍संचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी आणि सदनातील अभ्यागत याप्रसंगी उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त एक अनोखी परंपरा पाळली. यावेळी पुष्पगुच्छ ऐवजी सर्व प्रकाशकांना एक छोटेसे रोपटे भेट दिले.

 

या मागचे कारण डॉ. अडपावार यांनी स्पष्ट केले की, मराठी भाषा संवर्धन हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नाही तर एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. रोपटे हे या प्रक्रियेचे प्रतीक आहे. या रोपट्यांना जगवून आणि वाढवून आपण मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यास मदत करू शकतो.या उपक्रमाचे प्रकाशकांनी कौतुक केले. त्यांनी सांगितले की, हे एक अभिनव आणि उपयुक्त उपक्रम आहे. यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल

 

या ग्रंथ प्रदर्शनात रसिक साहित्य प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन, डायमंड बुक्स, साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट, आणि भारतीय साहित्य कला प्रकाशन दालने आहेत. साहित्य, संस्कृती, अर्थविषयक, राजकीय, ऐतिहासिक, वैचारिक अशा विविध विषयांवर आधारित सुप्रसिद्ध लेखकांसह, नवोदित लेखकांची  पुस्तके मांडण्यात आली आहेत.  पुढील दोन दिवस सकाळी १० ते सांयकाळी ७ पर्यंत हे ग्रंथ विक्री प्रदर्शन राहणार आहे.  राजधानीतील मराठी लोकांनी या ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सदन आणि परिचय केंद्राकडून करण्यात येत आहे.याठिकाणी परिचय केंद्राच्या वतीने ‘लोकराज्य’ मासिकाचे दालनही मांडण्यात आले  आहे. राज्य शासनाच्या विकास कामांची माहिती या माध्यमातून राजधानीतील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.

 

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाज माध्यमांवरून दररोज महाराष्ट्रातील कवी त्यांच्या स्वरचित रचनेचे  काव्य वाचन करतात. महाराष्ट्र सदन येथे दर्शनीय ठिकाणी मराठीमध्ये़ सुविचार लिहिले जात आहे.

 

मराठी भाषा विभागाच्या शासन निणर्यानुसार दिनांक १४ ते २८ जानेवारी दरम्यान ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’चे आयोजन राज्यात व राज्याबाहेरील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये करण्यात येते.

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 16दि. 19.01.2024


No comments:

Post a Comment