Saturday, 20 January 2024

महाराष्ट्रातील नंदुरबारच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार



 

नवी दिल्ली, 20: महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या आदित्य ब्राह्मणे यांना मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आदित्य यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. आदित्य यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते शौर्य श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आदित्य आणि त्यांचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्यांचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. आदित्य ब्राह्मणे यांनी आपल्या चुलत भावाचा जीव वाचवण्यासाठी आपला प्राण गमावला. हा त्याचा शौर्यपूर्ण प्रयत्न आहे. या प्रयत्नाबद्दल त्याला मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार 22 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी)’ असामान्य क्षमता आणि अतुलनीय कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा या श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 5 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक पुरस्कारार्थीला पदक, प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र दिले जाते.

 

राष्ट्रपतींच्या हस्ते 22 जानेवारी, 2024 रोजी विज्ञान भवन येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जातील. यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी देशातील 18 जिल्ह्यांमधून असामान्य कामगिरी करणाऱ्या 19 मुलांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी, 2024 रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. 26 जानेवारी, 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनातही ही मुले सहभागी होतील.

निवड झालेल्या मुलांच्या यादीमध्ये शौर्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या श्रेणींमध्ये प्रत्येकी एका मुलाचा तर समाजसेवेच्या श्रेणीत चार मुलांचा; क्रीडा प्रकारात पाच आणि कला आणि संस्कृती श्रेणीत सात मुलांचा समावेश आहे. या यादीत 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 9 मुले आणि 10 मुलींचा समावेश आहे.

00000000000000

 

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 17 दि.20.01.2024


 

No comments:

Post a Comment