Wednesday 14 February 2024

असीम सर्जकता: महाराष्ट्रातील 6 तरूण कलाकारांकडून “अष्टकला” राजधानीत चित्रप्रदर्शन

नवी दिल्ली, 14: महाराष्ट्रातील पाच व अन्य राज्यातून तीन अशा आठ चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार “अष्टकला” या शीर्षकांतर्गत दिल्ली येथील हॅबीटेट सेंटर येथे संपन्न झाले. येथील ओपन पाल्म आर्ट गॅलेरी, हॅबीटेट सेन्टरमध्ये एक समूह चित्रप्रदर्शन संपन्न झाले. आठ चित्रकारांचा त्यात सहभाग होता. त्यातील पाच मुंबईचे, दोन दिल्लीचे तर एक जबलपूरातील होते. प्रत्येक चित्रकाराची शैली भिन्न होती, त्यामुळेच या चित्रप्रदर्शनाला 'अष्टकला - आठ चित्रकारांची असीम सर्जकता' असे शीर्षक देण्यात आले होते. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन अग्रगण्य चित्रकार सजल पात्रा आणि अजय कुमार समीर यांच्या हस्ते झाले. हे दोन्ही चित्रकार सहभागी चित्रकारांच्या अनन्यशैलीने प्रभावित झाले होते. सहभागी आठ कलाकारा मध्ये विवेक प्रभुकेळुसकर हे मुंबईस्थित चित्रकार असून त्यांची साठाच्यावर चित्र प्रदर्शने झाली आहेत. ह्या प्रदर्शनात त्यांनी जलरंग आणि ॲक्रॅलिक रंगात रंगवलेली कल्पनारम्य चित्रे मांडली होती. वास्तववादी चित्रशैलीत त्यांनी लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालगणेशाचे भावविश्व रेखाटले होते. निलांगी प्रभुकेळुसकर यांनी पंचवीसपेक्षा अधिक चित्र प्रदर्शनात भाग घेतलेला आहे. कलेचे कुठलेही शिक्षण न घेता स्वशिक्षित असलेल्या निलांगी यांनी या प्रदर्शनात अमूर्तवादाचा अविष्कार मांडला होता. उजळ तेजस्वी रंग व ठळक गणितीय आकार हा त्यांच्या चित्रशैलीचा गाभा आहे. शीतल बावकर ह्या मुंबईस्थित चित्रकर्तीने 'दृश्यकला' या विषयात पीएच.डी. केली आहे. या व्यक्तीचित्रणात पारंगत असणाऱ्या या चित्रकर्तीने 'कुपंणामागे' या कल्पनेच्या भोवतालात चितारलेली आपली चित्रे सदर चित्रप्रदर्शनात मांडली होती. उशीता जैन ह्या चित्रकर्ती प्रिंटमेकिंग या तंत्राद्वारे आपल्या संकल्पनात्मक चित्रांची मांडणी करते. या चित्रप्रदर्शनात प्रिंटमेकिंगसोबत ह्या चित्रकर्तीने स्री-पुरुष-बालक यांच्यातील समानतेवरील प्रयोगात्मक चित्रेही मांडली होती. सुनिल विणेकर हे नवतंत्रावर स्वतंत्रपणे कार्यरत असणारे एक चित्रकार आहेत. या चित्रप्रदर्शनात त्यांनी प्रतिरुप चित्रणाच्या पद्धतीने साकारलेल्या भौमितिक प्रतिकांनीयुक्त चित्रे मांडली होती. सुनिता चौहान ह्या 1995 पासून शिल्पकार म्हणून काम करतात, त्यांनी प्रामुख्याने कास्यधातूच्या माध्यमातून स्रीवादी कल्पना मांडणारी शिल्पे घडवली आहेत. या चित्रप्रदर्शनात त्यांची हीच कास्यशिल्पे पहायला मिळाली. शर्मिला शर्मा ह्या जलरंग आणि ॲक्रॅलिक या माध्यमातून बाहुल्यांची चित्रमालिका साकारणाऱ्या चित्रकर्तीच्या चित्रातील प्रत्येक बाहुली स्वतंत्र रुप घेवूनच त्यांच्या चित्रांतून वावरताना दिसते. हीच बाहुल्यांची चित्रमालिका या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. हे चित्रप्रदर्शन 10 फेब्रुवारी रोजी सुरू झाले व 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पार पडले. ****************** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.30 / दिनांक 14.02.2024

No comments:

Post a Comment