Wednesday 19 June 2024

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट






नवी दिल्ली , 19 : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या लोकजन कल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.


याप्रसंगी श्री. बैस यांनी पंतप्रधान श्री. मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केली.


*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.77 / दिनांक 19.06.2024

 

महाराष्ट्रातील वाढवण येथे 76,200 कोटी रुपयांचे ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता






 

नवी दिल्ली 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळील वाढवण येथे 76,200 कोटी रुपये मूल्याचे बारमाही ग्रीनफिल्ड डीपड्राफ्ट प्रमुख बंदर उभारण्यास आज मंजुरी दिली. जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून हे बंदर उभे राहील. या प्रकल्पाची अंमलबजावणी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) आणि महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी) यांच्या सहकार्याने स्थापन केलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड (व्हीपीपीएल) द्वारे करण्यात येणार आहे.

 

या प्रकल्पांतर्गत बंदर आणि राष्ट्रीय महामार्गांदरम्यान रस्ता कनेक्टिव्हिटीची स्थापना आणि विद्यमान रेल्वे नेटवर्कशी जोडणी केली जाईल. यासोबतच, रेल्वे मंत्रालयाद्वारे आगामी समर्पित रेल्वे फ्रेट कॉरिडॉरही विकसित केला जाईल. या प्रकल्पाच्या खर्चात भूसंपादन घटकाचा समावेश आहे.

 

केंद्र सरकारच्या एकूण 76,220 कोटी रुपये खर्चाच्या नवीन बंदर प्रकल्पामुळे भारताचा जागतिक एकि्सम व्यापार प्रवाह सुधारेल. आयएमईईसी (इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर) आणि आयएनएसटीसी (इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर) द्वारे या बंदराची क्षमतावाढ, आंतरराष्ट्रीय व्यापाराला भक्कम पाठबळ देणारा ठरेल. या बंदरात 1,000 मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल्स, चार लिक्विड कार्गो बर्थ, एक रो-रो बर्थ, एक तटरक्षक धक्का आणि चार बहुउद्देशीय धक्के यांचा समावेश आहे. यासोबतच, 1,448 हेक्टर क्षेत्राचे पुनर्वसन, 10.14 किमी ऑफशोअर ब्रेकवॉटर आणि कंटेनर/कार्गोद स्टोरेज क्षेत्रांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे प्रत्येकवर्षी 298 दशलक्ष मेट्रिक टन (एमएमटी) संचयी हाताळणी क्षमता आणि 23.2 दशलक्ष TEUs कंटेनर हाताळणी क्षमता निर्माण होईल. हा बंदर प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) ला प्रोत्साहन देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करेल आणि सुदूर पूर्व, युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका आणि अमेरिकासारख्या देशांमध्ये जलमार्गाने जाणाऱ्या मोठ्या जहाजांना हाताळण्यास सक्षम असेल. वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर जगातील पहिल्या दहा बंदरांपैकी एक म्हणून ओळखले जाईल, ज्यामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार क्षमतेला एक नवा आयाम मिळेल.

 

हा प्रकल्प पीएम गतीशक्ती कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी अनुरूप आहे. या प्रकल्पामुळे जागतिक EXIM व्यापाराला चालना मिळणार असून, सुमारे दहा लाख व्यक्तींसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मजबूत आधार मिळेल, असे केंद्रीय प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

*****************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.76 / दिनांक 19.06.2024

 

राज्यपालांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सदिच्छा भेट





नवी दिल्ली, 19:- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची राष्ट्रपती भवनात आज सदिच्छा भेट घेतली.

 

 याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रपती महोदयांना पुष्पगुच्छ व मोराची मृर्ती भेट म्हणून दिली.

******************


आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.75/ दिनांक 19.06.2024

 

 


 

Saturday 15 June 2024

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर मराठी भाषेसाठी ‘उसवण’ यास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, तर ‘समशेर आणि भूत बंगला’ या कादंबरीला ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर





 

नवी दिल्ली, 15: साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी युवाआणि बालपुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी  देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या उसवणया कादंबरी ला युवासाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर बाल  साहित्यासाठी  साहित्यकार  व कथाकार भारत सासणे यांच्या समशेर आणि भूतबंगला' या कादंबरीला बालसाहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2024 साठी युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे.

  युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 23 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 24 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

मराठी भाषेसाठी देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार  जाहीर झाला. श्री  देविदास सौदागर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित युवा लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य विश्वात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना या त्यांच्या लेखनातील मुख्य विषयांपैकी एक आहेत. 'उसवण' ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्या लेखनात मानवी नात्यांची गुंतागुंत आणि समाजातील विविध प्रश्नांची चर्चा प्रकर्षाने आढळते. 'उसवण' ही कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते ज्यात कुटुंबातील नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचे सूक्ष्म चित्रण आहे. या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे बारकावे, आर्थिक संकटे आणि आधुनिकतेचे वाढते दबाव या सर्वांचे वर्णन आहे. कादंबरीतील पात्रांची विश्वसनीयता आणि कथानकाची गुंफण वाचकांना तल्लीन करते. देविदास सौदागर यांच्या शैलीत कथानकाचे नाट्यमय आणि संवेदनशील चित्रण आढळते, ज्यामुळे 'उसवण' ही कादंबरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.

मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक श्री किरण गुरव डॉ. शरणकुमार  लिंबाळे व श्री श्रीकांत उमरीकर  यांचा समावेश होता.

सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार भारत सासणे यांच्या समशेर आणि भुतबंगला’  या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला.  भारत जगन्नाथ सासणे हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठित कथाकार आहेत. त्यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कथा, लेखनशैली आणि कथावस्तूंमध्ये ग्रामीण जीवनाचे विविध पैलू, सामाजिक समस्या आणि मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यांच्या लेखनाची शैली वाचकांना विचारप्रवृत्त करते आणि त्यांच्या कथा मराठी साहित्य विश्वात एक विशिष्ट ठसा उमटवतात.

मराठी भाषेसाठी  तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये राजू तांबे, विजय नगरकर आणि विनोद शिरसाठ  या साहित्य‍िकांचा समावेश होता.

संस्कृतमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा नंतरच्या तारखेला केली जाईल, असे अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे.

******************

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.74 / दिनांक 15.06.2024

 

 


 

Friday 14 June 2024

कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले





महाराष्ट्रातील मुंबई-मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदतीची घोषणा


नवी दिल्ली, 14: कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत काही दिवसांपूर्वी 45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने मृतदेहांना कुवैतहून भारतात आणले गेले. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आज आगमन झाले. मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3 जणांचा समावेश आहे. या 30 जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले. उर्वरित मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या C-130J या विशेष विमानाने आणले गेले.


बुधवारी पहाटे साडेचार वाजता ही आग लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे सुरु झाली. भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काहीजण आगीत होरपळून व धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवैतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे. मुंबईच्या मालाड (पश्चिम), मालवणी येथील 33 वर्षीय डेनी बेबी जे मागील चार वर्षांपासून कुवैतमधील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते, ते मृत्युमुखी पडले.


मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3, उत्तर प्रदेशातील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा यासारख्या उर्वरित सात राज्यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण 45 जणांचा समावेश आहे.


भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेती अधिकारी सतत संपर्कात असून, या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हून अधिक भारतीयांवर उपचार सुरु आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृतदेह दिल्ली येथून रात्री 11.40 वाजता 6ई 519 या विमानाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येईल. सदर विमान शनिवारी पहाटे 1.40 वाजता मुंबई येथे पोहचेल. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी कुवैत येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक समन्वय साधत या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे.


महाराष्ट्रातील श्री डेनी बेबी करूणाकरण यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप पोहचविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राजशिष्टाचार अधिकारी किशोर कनौजिया यांनी याबाबत आवश्यक समन्वय केले.


पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी एक्सच्या माध्यमातून हा दुर्दैवी प्रसंग अत्यंत वेदनादायक असल्याचा शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.



*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.73 / दिनांक 14.06.2024

 

Monday 10 June 2024

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर








महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पीयूष गोयल यांच्यासह चार जणांचा समावेश


नवी दिल्ली, 10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.


महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा, पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार , रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.


संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी


केंद्रीय कॅबिनेट मंत्री :

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
अमित शाह – गृह मंत्रालय
अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
नितीन गडकरी – परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालय
मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास मंत्रालय
सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
मनसुख मांडविया – कामगार मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते मंत्रालय
ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्रालय
डॉ. विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
चिराग पासवान – क्रीडा मंत्रालय
किरेन रिजिजू – संसदीय कार्य मंत्रालय
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी मंत्रालय
ज्युवेअल राम – आदिवासी कार्य मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खणन मंत्रालय
निर्मला सीतारामण – अर्थ मंत्रालय
जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्रालय
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग मंत्रालय
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम मंत्रालय
भूपेंद्र यादव – पर्यावरण मंत्रालय
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण मंत्रालय
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
पीयूष गोयल – वाणिज्य मंत्रालय
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय


स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री:
इंदरजित सिंग राव – सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग
अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण मंत्रालय


राज्यमंत्री:
जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
श्रीपाद नाईक – ऊर्जा मंत्रालय
पंकज चौधरी – अर्थ मंत्रालय
कृष्णा पाल – सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
रामनाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालय
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते मंत्रालय
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे मंत्रालय
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालय
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज मंत्रालय
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी मंत्रालय
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक मंत्रालय
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय

*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.69/ दिनांक 10.06.2024


 

Sunday 9 June 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा संपन्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची उपस्थिती महाराष्ट्रातील सहा मान्यवरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 

                                        












नवी दिल्ली 9: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधान पदाची आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील भव्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासोबत महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुरेश खाडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी मोदींच्या शपथविधीचे कौतुक केले आणि देशाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव , रक्षा खडसे, आणि मुरलीधर मोहोळ  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जयदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह देशातील विविध राज्यांचे प्रमुख, राजकीय नेते, उद्योगजगताचे मान्यवर आणि अनेक परराष्ट्र प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. श्री मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली असून पुढील वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातील.

आज एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

*****************

आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.68 / दिनांक 09.06.2024

 


राजधानीत वीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी



 

नवी दिल्ली, 9: वीर महाराणा प्रताप सिंह यांची जयंती महाराष्ट्र सदन येथे आज साजरी करण्यात आली. कॉपरनिकस  मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी  आयुक्त रूपिंदर सिंग यांनी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  अपर निवासी  आयुक्त श्रीमती नीवा जैन, सहायक निवासी  आयुक्त डॉ. राजेश आडपावार, श्रीमती स्मिता शेलार व उपस्थित कर्मचाऱ्यांनी  महाराणा प्रताप सिंह यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****************

आम्हाला एक्सवर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र.67 / दिनांक 09.06.2024