नवी दिल्ली, 31 : देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सेंट्रल विस्टा येथे महाराष्ट्राचा फूड स्टॉल कायमस्वरूपी उभारण्यात आलेला आहे. या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते आज झाले.
दिल्लीतील इंडिया गेट जवळ असलेल्या नॉर्थ फूड कोर्टमध्ये हा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ देणारा स्टॉल सुरू करण्यात आला आहे. या स्टॉलद्वारे दिल्लीला भेट देणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्य संस्कृतीची ओळख करून देणे, या उपक्रमाचा उद्देश आहे. सध्या सेंट्रल विस्टा येथे देशातील 16 राज्यांचे फूड स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. यामध्ये साऊथ साईड आणि नॉर्थ साईड अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी आठ-आठ स्टॉल्स आहेत. महाराष्ट्राचा फुड स्टॉल नॉर्थ बाजूने आठ क्रमांकाच्या दालनात उभारण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र फूड स्टॉलवरून दिल्लीकर विविध पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. या स्टॉलचे संचालन श्रीनिवास हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे.
या स्टॉलच्या उद्घाटनाने महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दिल्लीला भेट देणारे पर्यटक या स्टॉलवरून महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, "महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभर पोहोचवण्याचे आमचे स्वप्न आहे. या दिशेने हे स्टॉल एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे."
सेंट्रल विस्टा येथे सर्व राज्यांचे फूड स्टॉल्स उभे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. यामुळे देशाच्या एकतेची भावना वृद्धिंगत होईल आणि विविध राज्यांची संस्कृतींची देवाण-घेवाण होण्यास मदत होईल.
महाराष्ट्राचा फूड स्टॉल दिल्लीतील सेंट्रल विस्टा येथे उभा राहणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असून, खाद्य संस्कृती जगभर पोहोचेल आणि राज्याच्या पर्यटन विकासालाही नवी दिशा मिळेल. दिल्लीकरांना आता पारंपारिक महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची चव त्यांच्या सोईनुसार अनुभवता येणार आहे.
****************
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त
वि. क्र.
110/ दिनांक 31.08.2024