Thursday, 5 September 2024

राजधानी येथील उद्योग समागमात उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सहभाग






नवी दिल्ली 5 : नवी दिल्लीतील यशोभूमी, द्वारका येथे रोजी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागामार्फत उद्योग समागमाचे आज आयोजन करण्यात आले होते. या समागमात देशातील सर्व राज्यांचे उद्योग मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व करताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत या कार्यक्रमात मध्ये उपस्थित होते.


या समागमात औद्योगिक वाढ, सामान्य आव्हाने आणि भविष्याच्या दिशा यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाचा आढावा मांडला आणि राज्यातील विकासाच्या अपार संधींचे सादरीकरण केले. त्यांनी राज्यातील विविध गुंतवणुकीच्या प्रकल्पांची सविस्तर माहिती केंद्रीय मंत्र्यांना यावेळी दिली.


उद्योग मंत्री सामंत यांनी कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राने पुन्हा एकदा फॉरेन डारेक्ट इनवेस्टमेंटमध्ये (एफडीआय) प्रथम स्थान मिळवले आहे. तसेच, केंद्र शासनाने महाराष्ट्राला दिलेल्या विविध प्रकल्पांचा आढावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी घेतले असल्याची माहिती दिली.


श्री. सामंत म्हणाले, "देशातील सर्वांत मोठे आणि जगातील दहाव्या क्रमांकाचे वाढवण बंदर विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने 76 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत, ज्याचे नुकतेच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यासेाबतच, कोकणातील दिघी पोर्टला इंडस्ट्रीयल सिटी म्हणून मान्यता मिळाली असून, या प्रकल्पात 38 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे आणि सुमारे 1 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती दिली .



उद्योग मंत्री सामंत यांनी पुढे माहिती दिली की, कॅबिनेट बैठकीत पनवेल येथे 83 हजार कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय, स्कॉडा कंपनी 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, रेमण्ड टेक्सटाईल्स 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. एकूणच, महाराष्ट्रात 1.50 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र आणि राज्य शासन एकत्रितपणे महाराष्ट्रात उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. राज्यात लेदर आणि इलेक्ट्रॉनिक क्लस्टर, तसेच अमरावतीचा टेक्सटाईल पार्क यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच, कोकणात डिफेन्स क्लस्टरच्या उभारणीसाठी लवकरच एमओयू केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


*****************

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic
अमरज्योत कौर अरोरा /वृत्त वि. क्र. 114/ दिनांक 05.09.2024

 

No comments:

Post a Comment