Wednesday, 13 September 2023

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नामांकन अर्ज सादर करता येणार

नवी दिल्ली 13 : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज सादर 15 संप्टेंबर 2023 पर्यंत सादर करण्याचे आवाहन महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून करण्यात आले आहे, या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत होती, आता ती वाढवून 15 सप्टेंबर 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी आपल्या मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार , क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचे (पीएमआरबीपी ) आयोजन करत असते. या पुरस्कारासाठी 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात किंवा कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम स्क्रिनिंग समितीव्दारे केली जाते आणि अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील. भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणा-या विशेष संमारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे. अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती पुढील वेबसाईटवर देण्यात आली आहे तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थाळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे. 00000000000000 आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 171, दि.13.09.2023

Saturday, 9 September 2023

जी-20 शिखर परिषदेचे आयोजन देशासाठी अभिमानाची आणि गौरवाची बाब - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीत दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेला सुरुवात

नवी दिल्ली, दि. 9: भारताला 18 व्या जी-20 शिखर परिषदेचे मिळालेले यजमानपद, हे आम्हा सर्व देशवासियांसाठी अभिमानाची व गौरवाची बाब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे, हीसुद्धा अभिमानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नवी दिल्ली येथील प्रगती मैदान परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम्’मध्ये जी-20 च्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे दिल्लीत दाखल झाले. परिषदेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सदनात उपस्थित प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राजधानी दिल्लीत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश असलेल्या देशांचे प्रमुख जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले असून, यंदा भारताने बांग्लादेश, इजिप्त, नेदरलँड, मॉरिशस, नायजेरिया, सिंगापूर, स्पेन, यूएई, ओमान या देशांच्या राष्ट्राध्यक्षांना विशेष आमंत्रित केले आहे. दोन दिवसीय परिषदेची सुरुवात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाली. त्यांनी याप्रसंगी उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले. या परिषदेत आरोग्य, व्यापार, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन दिवसीय चर्चासत्र असणार आहे. शनिवारी सकाळीपासून जी-20 शिखर परिषदेचे पहिले सत्र 'एक सृष्टी’चे (One Earth) आयोजन करण्यात आले. दुस-या सत्रात, ‘एक कुटुंब’ (One Family) यावर विचारमंथन झाले. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणजेच एक सृष्टी, एक कुटुंब, एक भविष्य (One Earth, One Family, One Future) ही 18 व्या जी-20 शिखर परिषदेची थीम आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये सन्मानाने घेतले जात आहे. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आणणे, यशस्वी चंद्रयान-3 अभियान, गेल्या नऊ वर्षांपासून देशात राबविण्यात आलेले विकास प्रकल्प, प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली देशाचे नाव उज्ज्वल झाले असल्याची प्रतिक्रियाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. शिखर परिषदेच्या संध्याकाळी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून उपस्थित सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनातील मंत्री, केंद्रीय राज्यमंत्री, सचिव, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यांच्या विविध हस्तकला वस्तू प्रर्दशनाचे दालन आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या भारतीय आदिवासी सहकारी विपणन संघाच्या वतीने (TRIFED) पारंपरिक आदिवासी कला, कलाकृती, चित्रे, मातीची भांडी, वस्त्र, सेंद्रीय नैसर्गिक उत्पादने आदी भारत मंडपम येथील हॉल क्रमांक तीन मध्ये ‘क्राफ्ट्स बाजार’ (Tribes India) उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे दालनही उभारले असून, यामध्ये पैठणी साड्या, वारली चित्रे, कोल्हापुरी चप्पल, हिमरू शाली, बांबूची उत्पादने आदी वस्तू प्रदर्शित केल्या आहेत. भारतातील विविध भागांतील हस्तकला उत्पादने ज्यात 'एक जिल्हा, एक उत्पादन' आणि जीआय-टॅग केलेल्या वस्तूंवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. या निमित्ताने परदेशी प्रतिनिधींना स्थानिक पातळीवर एका छताखाली उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात वर्षभरात 14 बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. मुंबईत आठ, पुण्यात चार, औरंगाबाद व नागपूर मध्ये प्रत्येकी एका बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या बैठकांमध्ये राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणुकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख परदेशी पाहुण्यांना करून देण्यात आली होती. *********** आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 169, दि.09.09.2023

Tuesday, 5 September 2023

महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतीच्या हस्ते 75 शिक्षकांना विशेष योगदानाबद्दल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली, 05: शालेय, उच्च व कौशल्य शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना आज राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक मोबाईल ऍप, उच्च गुणवत्तापूर्ण ई-सामुग्री निर्मिती, दृष्य व श्राव्य सामुग्री निर्मिती, संगणक,दूरचित्रवणी, यु-ट्युब, आकाशवाणी, सॉफ्टवेयर, हार्डवेयर आदिंचा उपयोग करून शालेय शिक्षण सुलभ, गुणात्मक आणि संशोधनात्मक बनविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपुर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह यासह वर‍िष्ठ अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी, महाराष्ट्रातील पाच शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष 2023 चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. यामध्ये शालेय विभागात आंबेगाव पुणे येथील, जिल्हा परिषद शाळेच्या मृणाल नंदकिशोर गांजळे, उच्च शिक्षण विभागात व्हीजेटीआय मुंबईतील केशव काशिनाथ सांगळे, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात स्थित आरसी पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन आणि संशोधन संस्थेतील डॉ.चंद्रगौडा रावसाहेब पाटील, आयआयटी मुंबईतील डॉ.राघवन बी. सुनोज तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागात मुंबईतील लोअर परेल येथील गव्हर्नमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या शिल्पनिेदशक, श्रीमती स्वाती देशमुख या शिक्षकांचा समावेश आहे. श्रीमती मृणाल गांजाळे पुणे येथील आंबेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे-शिंदे यांना २०२३ या वर्षाचा शालेय विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (National Teachers’ Award 2023) प्रदान करण्यात आला. भारतातून 50 शिक्षकांची तर महाराष्ट्रातून एका शिक्षिकेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना यापूर्वी २०१९ सालचा राष्ट्रीय आय.सी.टी. पुरस्कार व २०२२ सालचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. डॉ. राघवन बी सुनोज प्रा. राघवन बी. सुनोज मूळचे तिरुवनंतपुरमचे आणि आयआयटी बॉम्बेचे रसायनशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांना अध्यापन आणि संशोधनासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. रसायनशास्त्र मध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले असून 2001 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर कडून त्यांना सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला आहे. वर्ष 2012 पासून ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. वर्ष 2019 च्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रो.केशव सांगळे प्रो. केशव सांगळे यांना उच्चशिक्षणातील स्थापत्य अभियांत्रिकीमधील शैक्षणिक योगदान, संशोधन, शोधनिंबधन विद्यार्थी मार्गदर्शन, शैक्षणिक प्रशासन, पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था, राज्य व राष्ट्रीयस्तरावर केलेली मदत, राज्य व देशातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षण केल्याबद्दल 2023 या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील डॉ. चंद्रगौडा रावसाहेब पाटील यांना उच्चतर शिक्षणातील तंत्रज्ञान वापर, समाज उपयोगी संशोधन तसेच नाविन्यपूर्ण व विद्यार्थीभिमुख शिक्षण पध्दतीचा विकास व वापर यासाठी २०२३ या वर्षाचा उच्च शिक्षण विभागात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वाती योगेश देशमुख हस्तकला (क्राफ्ट्स कौशल्य) प्रशिक्षक अत्यंत समर्पित आणि कुशल संगणक कौशल्य प्रशिक्षणात उल्लेखनीय कारकीर्दीची दखल घेत, श्रीमती स्वाती योगेश देशमुख यांना वर्ष 2023 चा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यांना 22 वर्षांच्या प्रशिक्षण आणि मार्गदर्शन अनुभवासह, विद्यार्थ्यांना संगणक-संबंधित विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या कौशल्याचा गौरव केला गेला. त्यांनी आजतागायत 500+ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण आणि मदत करून सर्वसमावेशकता आणि समर्पण दर्शविले आहे. कठोर आणि पारदर्शक निवड प्रक्रियेव्दारे निवडलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम संपूर्ण भारतात आयोजित केला जातो. देशातील शिक्षकांच्या अव्दितीय योगदानाचा गौरव करणे व ज्या शिक्षकांनी आपल्या निष्ठेने आणि समिर्पित वृत्तीने केवळ शैक्षणिक गुणवत्ता सुधारली नाही, तर त्यांच्या विद्यार्थ्यांचे जीवन समृध्द केले आहे, त्यांचा सन्मान करणे हा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारचा उद्देश आहे. या वर्षापासून, राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या शिक्षकांचाही यात समावेश करण्यात आला आहे. यावर्षी 50 शालेय शिक्षक, उच्च शिक्षण विभागातील 13 शिक्षक आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या 12 शिक्षकांचा या पुरस्काराने पुरस्कृत केले आहे. गुणवत्तेचे प्रमाणपत्र, 50,000 रुपये आणि एक पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. ********* आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 167, दि.05.09.2023 -पुरस्कार विजेत्यांबाबतची माहिती- श्रीमती मृणाल गांजाळे श्रीमती मृणाल गांजाळे- शिंदे यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत माहिती तंत्रज्ञानाचा अभिनव वापर जगभरातील विद्यार्थ्यांना व्हर्चुअल प्रकारे शिक्षणाचे आदान-प्रदान, गेमी फिकेशन इन एज्युकेशन प्रकल्प, AR-VR चा वापर, असे वेगवेगळे तंत्रज्ञानावर आधारित प्रयोग केले. ऑनलाइन शिक्षण, इतर देशातील शाळांशी थेट विद्यार्थ्यांचा संवाद, वेबसाइट मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर, राज्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण, कोरोना काळात शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अत्याधुनिक शिक्षण दिले. त्यांचे सन २०१९-२०२० या वर्षात इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्तीधारक १७ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थी नवोदय २ विद्यालयासाठी निवड पात्र ठरले. पंतप्रधान विद्या वाहिनी वर शिक्षकांसाठी मार्गदर्शन पर सेशन मध्ये CIET-NCERT मार्फत तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले मागील वर्षी मायक्रोसॉफ्ट ceo सत्या नडेला यांनी देखील दिल्ली येथे त्यांच्या शैक्षणिक कामाचे कौतुक करून सन्मान केला . राष्ट्रीय आय.सी.टी मेला मध्ये देखील त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. डॉ राघवन सुनोज डॉ.सुनोज यांनी सेंट जोसेफ स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले असून, युनिव्हर्सिटी कॉलेज, तिरुवनंतपुरममध्ये शिक्षण घेतले आहे. डॉ सुनोजने बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून पीएचडी प्राप्त केली. ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये संशोधन केल्यानंतर, ते वयाच्या 29 व्या वर्षी आयआयटी बॉम्बेमध्ये लेक्चरर म्हणून रुजू झाले. डॉ. सुनोज यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CISR) 2019 मध्ये प्रतिष्ठित 'शांती स्वरूप भटनागर विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार' प्रदान केले आहे. प्रो. केशव सांगळे प्रो. सांगळे हे सध्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे संरचना अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख आणि संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका शासकीय तंत्रनिकेतन पुणे, पदवी व पदव्युतर पदवी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथे घेतली. त्यांनतर त्यांनी पीएचडी ही पूर्ण केली. डॉ चंद्रगौडा पाटील डॉ पाटील हे विद्यार्थ्यांना स्वत:च्या गतीने क्लिष्ठ विषयाचे अवलोकन करता यावे यासाठी मागील दोन दशकांपासून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण उपकरणे, शैक्षणिक साहित्य व शिक्षण पध्दती विकसित करण्यासाठी प्रयत्नशील असतात. डॉ. पाटील यांनी विकसित केलेले एक्स-कोलॉजि व कॅलफार्म नामक परस्पसंवादी सॉफ्टवेअर औषधनिर्माण, वैद्यकीय, पॅरामेडिकल व पशुवैदकीय क्षेत्रात अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांना वरदान ठरले आहे. या सॉफ्टवेअरच्या वापरामुळे शैक्षणिक उद्ष्टीसाठी केल्या जाणा-या विच्छेदनाला आळा बसून देशातील हजारो प्राण्यांचे जीव वाचले आहेत. यापूर्वी डॉ.पाटील यांना होमीओपॅथी क्षेत्रातील संशोधन कार्याबद्दल भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देण्यात येणारा एक लाख रुपयांचा युवा वैज्ञानिक पुरस्कार प्राप्त झालेले असून डॉ.पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. श्रीमती स्वाती देशमुख श्रीमती स्वाती देशमुख यांनी 4 सप्टेंबर 2010 पासून मुंबईतील सरकारी ITI लोअर परेल येथे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग (COPA)असिस्टंट ट्रेडच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी संस्थेची वेबसाइट विकसित करून, शैक्षणिक युट्युब व्हिडिओ तयार करून आणि संगणक-आधारित प्रशिक्षण (CBT) मॉड्यूल डिझाइन करून त्यांच्या संस्थेच्या तांत्रिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याव्यतिरिक्त, प्रशिक्षणार्थींसाठी एक ई-लायब्ररी स्थापन केली आहे, डिजिटल शिक्षण संसाधनांचा प्रचार केला आहे. श्रीमती देशमुख यांनी संस्थेमध्ये हाय-टेक, इंटरनेट-सक्षम कॉम्प्युटर लॅबची स्थापना करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शिक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने उपलब्ध करण्यात तसेच विविध सक्षम विद्यार्थ्यांचे सक्षमीकरणात व रोजगार सुरक्षित करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. ********

Friday, 1 September 2023

‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात

नवी दिल्ली, 01 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. प्रदर्शन व विक्री 19 सप्टेंबर 2023 पर्यंत सुरु राहणार आहे. महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या मूर्तींना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमूर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने गेल्या ३० वर्षांपासून गणेशमूर्ती व पुजेच्या साहित्याची विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रात 3० गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा होतो. अमराठी भक्तांचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग असतो. महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी पहिल्याच दिवशी लोकांची वर्दळ सुरु झाली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रदर्शन व विक्रीकरिता असलेल्या गणेशमुर्तींची कमाल उंची ३ फुट आहे. येथील उद्योजक, विविध क्षेत्रांतील मान्यवर यांच्यासह गणेश मंडळांनी गणरायाच्या मोठया मूर्ती राखीव करून ठेवल्या आहेत. ठाणे येथील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील 25वर्षांपासून ‘मऱ्‍हाटी’ एम्पोरियममध्ये गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात. एम्पोरियमच्या दालनात यंदा लहान मोठया आकाराच्या एकूण 1000 गणेशमूर्ती आहेत. यासर्वच मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या अर्थात पर्यावरणपूरक आहेत. 6 इंच ते 3 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध असून 500 रूपयांपासून ते 26 हजार रूपयांपर्यंत या मूर्त्यांची किंमत आहे. महामंडळाच्या बाबा खडकसिंह मार्गवरिल ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात 19 सप्टेंबर 2023 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता महामंडळाच्या 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येणार आहे.

Monday, 28 August 2023

खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर जलशक्ती मंत्रालयाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल केला प्रकाशित


नवी दिल्ली, 28: केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल प्रकाशित केला असून, खोदलेल्या विहिरी, भूपृष्ठावरील जल आणि उपसा सिंचन योजनांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच देशात लघुसिंचन योजनांमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचेही नमूद आहे.



देशात उत्तर प्रदेशात सर्वाधिक लघु जलसिंचन योजना आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. भूजल योजनेतही उत्तर प्रदेश आघाडीवर आहे, त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगण ही राज्ये आहेत. भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, ओदिशा आणि झारखंड या राज्यांचा सर्वाधिक वाटा आहे.



जलसंपदा मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाने लघु जलसिंचन योजनांचा सहावा गणना अहवाल 26 ऑगस्ट रोजी प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार देशामध्ये 23.14 दशलक्ष लघु जलसिंचन योजनांची नोंद झाली आहे, ज्यापैकी 21.93 दशलक्ष (94.8%) योजना भूजल आणि 1.21 दशलक्ष योजना(5.2%) भूपृष्ठावरील जल योजना आहेत.



लघु जल सिंचन योजनांमध्ये डगवेल्सचा सर्वाधिक वाटा आहे, त्याखालोखाल कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक डगवेल्स, भूपृष्ठावरील वाहणाऱ्या पाण्याच्या आणि उपसा सिंचनाच्या योजना आहेत. तर उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाब ही राज्ये अनुक्रमे कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांमध्ये आघाडीवर आहेत. सर्व लघु सिंचन योजनांपैकी 97.0% योजना वापरात आहेत, 2.1% योजना तात्पुरत्या स्वरुपात वापरात नाहीत, तर 0.9% योजना कायमस्वरुपी बंद आहेत. कमी खोलीवरील आणि मध्यम खोलीवरील योजना वापरात असलेल्या योजनांमध्ये आघाडीवर आहेत. लघु सिंचन योजनांपैकी बहुसंख्य (96.6%) योजना खाजगी मालकीच्या आहेत. भूजल योजनांपैकी खाजगी मालकीचा वाटा 98.3% आहे तर भूपृष्ठावरील जल योजनांमध्ये खाजगी मालकीचा वाटा 64.2% आहे.



भूजल योजनांमध्ये डगवेल्स, कमी खोलीवरील कूपनलिका, मध्यम खोलीवरील आणि जास्त खोलीवरील कूपनलिकांचा समावेश आहे. भूपृष्ठावरील योजनांमध्ये पृष्ठभागावरील वाहते पाणी आणि उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. 5 व्या सिंचन योजना गणनेच्या तुलनेत 6 व्या गणनेत लघु जलसिंचन योजनांमध्ये 1.42 दशलक्ष योजनांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल आणि भूपृष्ठावरील अशा दोन्ही योजनांमध्ये अनुक्रमे 6.9% आणि 1.2% वाढ झाली आहे.



00000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

  • अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 165 , दि.28.08.2023

 

Sunday, 27 August 2023

महाराष्ट्राच्या शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

 


नवी दिल्ली, २७: केंद्र सरकारकडून यावर्षीचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारयादी जाहिर झाली असून, राज्यातून एकमेव जिल्हा परिषद शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे यांना पाच सप्टेंबरला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार मिळणार आहे.

 

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही देशातील शिक्षकांना शिक्षक पुरस्काराने 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. श्रीमती मृणाल गांजाळे या जिल्हा परिषद शाळा गाव महाळुंगे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी राज्य शिक्षक पुरस्कार आणि आयसीटी अवॉर्डही मिळालेला आहे.

 

शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

00000

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा: http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र.164 , दि.27.08.2023


Friday, 25 August 2023

आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे : मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील




 


















 


 

नवी दिल्ली, 25 : आपत्ती व्यवस्थापनातून दुष्काळग्रस्त भागाला अधिक मदत करण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे, यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावर उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

 

          श्री पाटील यांनी केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती सीतारमण यांची  नार्थ ब्लॉक येथे भेट घेतली. या भेटीनंतर दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले, राज्यात काही ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे. अशा वेळी दुष्काळग्रस्त भागासाठी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत काय उपाययोजना करता येऊ शकतात आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत केंद्र शासनाकडूनही करण्यात यावी याबाबत चर्चा झाली. यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत येत्या काळात भेट घेऊन चर्चा करण्यात येईल, अशी माहिती  दिली. तसेच यासंदर्भात राज्याकडून केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

ओला दुष्काळ जाहिर करण्याचे निकष बदलून यात शिथीलता आणण्यात यावी, अशी मागणी येत्या काळात केंद्रीय गृह मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

 

 

 

लोअर तापी प्रकल्पाचा समावेश पीएमकेएसवाय मध्ये करावा

                                                   मंत्री अनिल पाटील

 

जळगाव जिल्ह्यातील निम्न (लोअर) तापी प्रकल्पाचा समावेश प्रधान मंत्री सिचाई योजनेत करावा अशी मागणी राज्याचे मदत व पुर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार आणि केंद्रीय जल आयोगाचे (Central Commission of Water) अध्यक्ष कुश्विन्दर वोहरा यांच्या भेटी दरम्यान केली. या प्रकल्पाचा  अंदाजित निधी 4881 कोटीचा असून राज्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पीएमकेएसवायमध्ये समाविष्ट झाल्यास प्रकल्प पूर्ण होण्याच्या कामाला गती मिळेल तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर  40 हजार हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येऊ शकते. यामुळे या क्षेत्रातील उद्योगांना, स्थानिक लोकांना पाण्यापासून निर्माण होणाऱ्या समस्यांपासून दिलासा मिळेल. तत्पूर्वी याबाबतही केंद्रीय वित्त मंत्र्याशी झालेल्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

 

00000

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक बळकट करणे राज्याची प्राथमिकत : मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील




 

नवी दिल्ली, 25 : हवामान बदलामुळे अवेळी येणारा पाऊस, चक्रीवादळदुष्काळ अशावेळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज असने ही काळाची गरज असून ही यंत्रणा अधिक बळकट करणे ही राज्याची प्राथमिकता आहे. आज यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विभाग प्रमुख आणि सदस्य यांची भेट घेतली असल्याची माहिती बैठकीनंतर राज्याचे मदत व पुर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली .

 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विभाग प्रमुख तसेच सदस्य कमल किशोर, सदस्य राजेंद्र सिंग, क्रिष्णा एस. वत्स  यांची त्यांच्या कार्यालयात  मंत्री श्री पाटील यांनी भेट घेतली.

 

मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यातील प्रशासकीय  विभागात होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनात स्थानिक युवकांचा प्रामुख्याने  समावेश असावा यासाठी राज्य योजना आखत आहे. यामध्ये तात्काळ देण्यात येणाऱ्या मदतीसाठी त्यांना अद्यावत साधने (किट) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने  आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी श्री. पाटील यांनी केली.

 

आपत्ती येऊ शकणाऱ्या जिल्ह्यांची माहिती राज्याने केंद्र शासनाला दिली असल्याचे प्राधिकरणाच्या सदस्यांनी सांगितले याअतंर्गत येणाऱ्या काळात एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईड, नेहरू युवा केंद्राच्या विद्यार्थ्यांना येत्या काळात  प्रशिक्ष‍ित केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. याचे मॉकड्रील प्रशिक्षण वांरवार सबंधित यंत्रणेकडून दिले जावे अशी अपेक्षा यावेळी प्राधिकरणाच्या सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली.

 

 प्रत्येक कुंटूबातील किमान एका व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. राज्यात सध्या 20 जिल्ह्यांमध्ये 7900 ‘आपदा मित्र’ आहेत. 76 स्थायी निवारण केंद्र आहेत. हे तीन माळयाचे असून प्रथम माळा स्त्रीयांसाठी, दुसरा वृद्धांसाठी आणि तिसरा माळा युवकांसाठी असतो. साधरणत: जून ते ऑगस्टच्या काळात हे केंद्र रिकामे केले जाते. अन्यथा स्थानिक लोक या केंद्रांमध्ये विविध उपक्रम राबवितात यातून केंद्रामध्ये स्वच्छता ही होते, अशी माहिती दिली. याशिवाय राज्यात लहान-लहान निवारण केंद्र राज्य सरकार आवश्यकते नुसार उभारू शकतात असे ही या सदस्यांद्वारे सांगण्यात आले.

 

येत्या काळात राज्यातील आपदा मित्रांना आपत्तीच्या काळात वापरण्यात येणारी सुसज्ज किट देण्यात येईल, अशी माहिती श्री पाटील यांनी यावेळी दिली.

 

00000
 

1 सप्टेंबर पासून चिपी विमानतळावरून कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार




पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट
नवी दिल्ली, 25 - सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा, येत्या 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली.

नवी दिल्ली येथील राजीव गांधी भवन येथे झालेल्या बैठकीनंतर श्री. चव्हाण यांनी ही माहिती दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत, प्रत्यक्षरित्या केलेल्या सततच्या पाठपुरावामुळे तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच ख-या अर्थाने कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्‍त केली.

चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. तथापि, कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासियांचे तसेच मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवे संदर्भात भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात श्री. चव्हाण यांनी श्री. शिंदे यांना सविस्तर माहिती दिली. येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरु करण्याची विनंती पालकमंत्री चव्हाण यांनी या बैठकीत केली. त्यानुसार येत्या 1 सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरु करण्यात येईल तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलांयन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांव्दारे ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रिय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील असे आश्वासनही दिल्याची माहिती श्री.चव्हाण यांनी दिली.

चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती व त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन केल्याची माहितीही त्‍यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या विषयामध्ये प्रयत्न केल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

आयआरबीने विमान प्राधिकारणाकडून करावयाच्या ज्या आवश्यक पूर्तता येत्या ४ दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची ग्वाही आयआरबीचे अध्यक्ष तसेच व्यस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी व एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली.

या बैठकीला केंद्रीय मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडिगो, एअर इंडिया, एअर अलास्का चे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआरबीचे किरण कुमार उपस्थित होते.

00000

आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic

अमरज्योत कौर अरोरा /वृ.क्र 162 , दि.25.08.2023

 

Thursday, 24 August 2023

‘एकदा काय झालं ’ या चित्रपटाला सर्वोत्तम मराठीसाठी, तर ‘गोदावरी’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर

















69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची आज घोषणा

 

नवी दिल्ली, 24 :  ‘ एकदा काय झालं  या चित्रपटला मराठी भाषेतील सर्वोत्तम चित्रपटाचा तर गोदावरी या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनसाठी पुरस्कार जाहीर झाला.  यासह नॉन फिचर फिल्म श्रेणीतील विशेष परीक्षक पुरस्कार रेखाया मराठी चित्रपटाला  तर सामाजिक विषयांवरील नॉन फिचर फिल्मसाठी  थ्री टू वन ’ या मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटाला जाहीर झाला.   आज 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.   

 

येथील नॅशनल मिडीया सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत वर्ष 2021 साठीच्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. याप्रसंगी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अतिरीक्त सचिव निरजा शेखर, चित्रपट लेखन परीक्षक समितीचे अध्यक्ष यतींद्र मिश्रा, नॉन फिचर फिल्म परीक्षक समितीचे अध्यक्ष वसंथ साई, चित्रपट परीक्षक समितीचे अध्यक्ष केतन मेहता यांनी विविध श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची  घोषणा केली.

फिचर फिल्ममध्ये विविध 32  श्रेणीत पुरस्कार जाहीर झालेले आहेत यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्ममध्ये विविध 24 श्रेणीमध्ये पुरस्कार जाहीर झाले.

 

एकदा काय झालं’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

 

वर्ष 2021 मध्ये मराठी भाषेमधून एकदा काय झालं हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. वडील आणि मुलाच्या नात्यातील नितांत सुंदर आणि हळवा प्रवास चित्रपटातून दाखविण्यात आलेला आहे. या चित्रपटाला रजत कमल पुरस्कार जाहीर झाला असून  निर्माता गजवंदना शो बॉक्स एलएलपी तर दिग्दर्शक सलील कुलकर्णी हे आहेत.

गोदावरी (द होली वॉटर) या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन न‍िख‍िल महाजन यांनी केले. पुरस्काराचे स्वरूप स्वर्ण कमळ,  2 लाख 50 हजार रोख असे आहे.

नॉन फिचर फिल्म श्रेणीतील सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार थ्री टू वन’  या हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत असणाऱ्या चित्रपटला  जाहीर झालेला आहे.  हा पुरस्कार संयुक्तरीत्या मिठू’  सोबत मिळालेला आहे. थ्री टू वन’  या सिनेमाची निर्मिती एफटीआयआय ची असून दिग्दर्शक हिमांशू प्रजापती आहेत. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि प्रत्येकी 50,000 हजार रूपये रोख आहे.

 ‘रेखा या मराठी नॉन फिचर फिल्मला विशेष परीक्षक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर बापु रणखांबे यांनी केले आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमल आणि 1 लाख रूपये रोख आहे.

हिंदीमधील सर्वोत्कृष्ट स‍िनेमा सरदार उधम हा ठरला.  2021 यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये दक्ष‍िण स‍िनेमे अधिक दिसून आले असून उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पुष्पा  या तेलगु चित्रपटासाठी अल्लु अर्जून ला जाहीर झाला आहे. उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार 2 अभिनेत्रींना विभागून मिळणार आहे. गंगुबाई काठ‍ियावाडी’ या चित्रपटासाठी आल‍िया भट तर मिमी या चित्रपटसाठी क्रिती सेनॉन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. उत्कृष्ट सहअभिनेत्याचा पुरस्कार मिमी या हिंदी सिनेमासाठी पंकज त्रिपाठी तर उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार  पल्लवी जोशी यांना द कश्मीर  फाइल्स या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार रॉकेट्री द नांबी इफेक्ट’ अंतराळ वैज्ञानिकावर आधारीत असणाऱ्या चित्रपटाला जाहीर झाला आहे. तर संपूर्ण मनोरंजन या श्रेणीतील  पुरस्कार आर आर आर या तेलुग सिनेमाला जाहीर झालेला आहे. नर्गीस दत्त राष्ट्रीय एकात्मता या श्रेणीतील पुरस्कार द कश्म‍ीर फाइल्स’ या हिंदी सिनेमाला जाहीर झालेला आहे.

सिने सृष्टीतील एकूण उत्कृष्ट कारकीर्दीसाठी देण्यात येणारा दादासाहेब फाळके राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा नंतर करणार असल्याचे आजच्या पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.