Thursday, 10 December 2015

देशाला अन्न-धान्यात निर्यातदार बनविण्यात पवारांचे मोलाचे योगदान - राष्ट्रपती

          
     
नवी दिल्ली दि. १० : भारताला जागतिकस्तरावर अन्न-धान्यात  निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान असल्याचे गौरवोदगार राष्ट्रपती प्रणब मुखर्जी  यांनी काढले .
        विज्ञान भवनात आज आयोजित शदर पवार यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमीत्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीमती प्रतिभा शरद पवार यांच्यासह मान्यवर मंचावर उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
        राष्ट्रपती म्हणाले, शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतक-यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले. ९० च्या दशकात महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर अंडरवर्ल्डचे सावट होते याच काळात या शहरात बॉम्ब स्फोट झाले. अशा वाईट अवस्थेत पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सक्षम नेतृत्च दिले. कठोर व अचूक निर्णय घेत मुंबईतून अंडरवर्ल्डचा नि:पात केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल  त्यांना सलाम बॉम्बे आणि सलाम पवार म्हणनेऔचित्याचे ठरेल, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांचा गौरव करत त्यांना दिर्घ आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत ५ दशक वावर असणारे  पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौ-यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपासी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना उजाळा दिला.
 यावेळी  उपराष्ट्रपती हामीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी शरद पवार यांनी आपल्या मनोगतात वयाच्या अठराव्या वर्षापासून राजकीय जीवनात प्रवेश करून जनतेने या सर्व प्रवासात दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री व आपले राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून संसदीय कामकाज व राजकीय शिष्टाचाराचे धडे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या प्रसंगी आई-वडीलांच्या आठवण होत असल्याचा उल्लेख करीत त्यांच्याकडून शिक्षण प्रसार, सहकार आणि राजकीय क्षेत्राचे बाळकडू मिळाले असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी विविध आठवणींना उजाळा दिला.
मंचावर माजी पंत प्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, समाजावादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालु प्रसाद यादव, कम्युनीस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी, माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुला आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. याशिवाय राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया, विविध केंद्रीय मंत्री, खासदार,  आमदार तसेच देशातील  व महाराष्ट्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शरद पवार यांच्या कार्याचा वेध घेणारी लघु चित्रफित दाखविण्यात आली. तसेच शरद पवार यांच्या जीवनावर आधारीत गौरव ग्रंथ,माय टर्मआणि  लोक माझे सांगातीया पुस्तकांचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे  प्रस्ताविक खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले तर आभार खासदार सुप्रिया सूळे यांनी मानले.


No comments:

Post a Comment