Friday, 11 December 2015

‘कला उत्सवा’ त महाराष्ट्राला यश





नवी दिल्ली, दि. ११ : महाराष्ट्राच्या शालेय विद्यार्थ्यांच्या संघाने सादर केलेल्या तमाशा या लोकनाटयाला आणि पोवाळा या लोक संगीताला कला उत्सव २०१५ या लोककलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत वेगवेगळया गटात तिस-या क्रमांकाचे पुरस्कार पटकावले.    

येथील राष्ट्रीय बालभवनात दिनांक ८ ते १० डिसेंबर दरम्यान मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित करण्यात आले. कला उत्सवातील स्पर्धांचे निकाल आज जाहीर झाले. विजेत्या संघांना येथील श्रीफोर्ट सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृति ईराणी यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. मनुष्यबळ विकास राज्यमंत्री द्वय उपेंद्र कुशवाह आणि प्रो. राम शंकर कथेरिया,नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी, प्रसिध्द नट रस्कीन बाँड आणि प्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंह यावेळी उपस्थित होत्या. यावेळी विजेत्या संघांनी यावेळी लोककलांचे सादरीकरण केले.

 तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विविध राज्यांतील १४०० विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकनाटय प्रकारात महाराष्ट्राच्या तमाशा ला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर लोक संगीत प्रकारातपोवाळयालाही तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. राज्यातील १६ विद्यार्थीनी व २५ विद्यार्थी अशा एकूण ४१ शालेय विद्यार्थ्यांचासंघ आणि राज्याच्या विद्यार्थी विकास विभागाच्या उपसचिव तथा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाच्या राज्यातील प्रकल्प संचालक डॉ. सुवर्णा खरात, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे समन्वयक तथा प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत,कार्यक्रम अधिकारी सलील वाघमारे  यांनी पुरस्कार स्वीकारला.

या उत्सवात महाराष्ट्राच्या संघाने लोककेलेचे तीन प्रकार सादर केले. लोकनाटय या प्रकारात तमाशा, लोक नृत्य प्रकारात वाघ्या मुरळी आणि पोवाळा या लोक संगीत प्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. या लोककलांच्या माध्यमातून स्त्रीभ्रण हत्या रोखण्याचाआणि मुलींना शिकविण्याचा संदेश देण्यात आला. यासोबतच दृष्यकला प्रकारात महाराष्ट्रातील मातीकलेचे सादरीकरणही करण्यात आले.
                                                          
                                                         ०००००
                                                        




No comments:

Post a Comment