Thursday 17 December 2015

‘चलत चित्रव्यूह’ या मराठी पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर नवी

                      
  दिल्ली, दि. १७ : ज्येष्ठ लेखक व दिग्दर्शक अरूण खोपकर यांच्या चलत चित्रव्यूह या पुस्तकास मराठी भाषेसाठीचा वर्ष २०१५ चा साहित्य अकादमी पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला.
            साहित्य अकादमीच्या वार्षीक पुरस्कारांची घोषणा आज रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात करण्यात आली. देशातील २३ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात  सर्वोत्कृष्ट पुस्तकांची निवड करण्यात आली. संस्मरणे या साहित्य प्रकारात प्रसिध्द मराठी लेखक अरूण खोपकर लिखित चलत चित्रव्यूह या पुस्तकाची  मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली. लेख‍क उदय भेंब्रे यांच्या कर्ण पर्व या  पुस्तकाची नाटक या साहित्य प्रकारात कोकणी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून निवड करण्यात आली.       १ लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील वर्षी १६ फेब्रुवारी रोजी   या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
             चलत चित्रव्यूहया पुस्तकात लघुपट निर्मिती, चित्रपट बनवणे आणि चित्रपटकलेचे अध्यापनासाठी अरूण खोपकर यांनी केलेल्या देश व जगभर प्रवासातील लेख व व्यक्तिचित्रणे लिहीलेले आहेत. वाचनाचे वेड,अफाट पुस्तक संग्रह, चित्रकला, संगीत, नृत्य यामधील व्यासंग यामुळे खोपकर अनेक कलावंताना भेटले खोपकारांनी आपल्या लेखन शैलीतून चलत चित्रव्यूह या पुस्तकाच्या माध्यमातून हा कला व्यवहार लिलया मांडला आहे.
            मराठी साहित्यातील पुस्तक निवडीसाठीच्या निवड समितीत  प्रसिध्द साहित्यिक ना.धो.महानोर, अरूण साधूआणि प्रा. दिगंबर पाध्ये यांचा समावेश होता.

आज जाहीर झालेल्या पुरस्कारांमधे सहा काव्य संग्रह, सहा कथा संग्रह, चार कांदबरी, दोन निबंध, दोन नाटक आणि दोन समिक्षांसह एका संस्मरणाचा समावेश आहे. बंगाली भाषेतील पुरस्कार आज जाहीर करण्यात आलेला नाही काही दिवसात हा पुरस्कार जाहीर होणार आहे. 

No comments:

Post a Comment