नवी दिल्ली, दि.३: मराठी साहित्य व्यवहार वाचक-श्रोत्यांपर्यंत
पोहचविण्याचे महत्वाचे काम मराठी प्रसार माध्यमांनी सक्षमपणे केले असल्याचे गौरवोदगार
साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी काढले.
महाराष्ट्र
परिचय केंद्रात आयोजित ‘दिवाळी अंक प्रदर्शनाचे’ उदघाटन डॉ. श्रीनिवासराव
यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद
कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, ग्रंथपाल रामेश्वर बरडे तसेच परिचय
केंद्राचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
डॉ. श्रीनिवासराव म्हणाले, देशातील इतर
भाषांच्या तुलनेत मराठी साहित्याला प्रसार माध्यमांमधे विशेष स्थान दिले जाते. अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडी पासून या संमेलनाचे
वार्तांकन देश, विदेशात सर्वदूर पोहचविण्याचे काम प्रसार माध्यमे करतात. साहित्यातील
नवनवे प्रवाह वाचकांपर्यंत पोहचविण्याचे कामही माध्यमे करीत असून हे कौतुकास्पद
असल्याचे त्यांनी म्हटले. मराठी भाषेत दरवर्षी ४०० च्या वर साहित्य संमेलन भरविण्यात
येतात. मराठी साहित्याने देशाला उत्तमोत्तम साहित्यिक दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
परिचय केंद्राचे
दिवाळी अंक प्रदर्शन स्तूत्य उपक्रम
दिल्लीतील मराठी वाचकांसाठी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात येणारा दिवाळी अंक प्रदर्शनाचा उपक्रम स्तूत्य
असल्याच्या भावनाही डॉ. के. श्रीनिवासराव यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, मराठी
साहित्याला उत्तम लेखकांची दिर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या मराठी भाषेत प्रकाशित होणा-या दिवाळी अंकानी
साहित्याची ही परंपरा सक्षमपणे जपली आहे. शंभराहून अधिक वर्षाच्या या परंपरेला
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या ग्रंथालयानेही दिल्लीतील मराठी वाचकांपर्यंत
पोहचविण्याचे स्तूत्य काम केल्याचे ते म्हणाले. हा उपक्रम असाच सुरु रहावा अशी
अपेक्षा व्यक्त करीत साहित्य अकादमीतर्फे आवश्यक मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी
दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दयानंद कांबळे
यांनी दिवाळी अंकाचे महत्व आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक
प्रदर्शनाची परंपरा याबाबत माहिती दिली. मराठी साहित्याच्या योगदानावरही त्यांनी
यावेळी प्रकाश टाकला. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक
प्रदर्शनात विविध विषयांवरील १०७ दिवाळी अंक मांडण्यात आले असून आज पासून हे
प्रदर्शन वाचकांसाठी खुले करण्यात आले आहे.
|
00000000
No comments:
Post a Comment