Wednesday, 13 January 2016

राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रातील 25 एनसीसी कॅडेटस


नवी दिल्ली, 13 : प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी ला राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील 25 एनसीसी कॅडेटसची निवड झाली आहे.

           येथील छावनी भागातील डिजी एनसीसी परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते या शिबीराचे उदघाटन झाले. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे जवळपास २१०० कॅडेट्स यात सहभागी झाले आहेत. राज्यातील ११४ एनसीसी कॅडेटस १ जानेवारी पासून या शिबीरात दाखल झाले आहेत. यातील २५ कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी तर 9 एनसीसी कॅडेटसची 28  जानेवारी ला  होणा-या पंतप्रधान रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाल्याची माहिती महाराष्ट्राच्या एनसीसी संघाचे उपप्रमुख तथा जळगांव जिल्हयातील चोपडा येथील प्रताप विद्यामंदिरचे  मेजर आर.आर. शिंदे यांनी दिली.

            शिबीरात सहभागी महाराष्ट्राच्या संघातील एकूण 114 कॅडेटस पैकी 77 मुले तर 37 मुली आहेत. त्यातील 16 कॅडेटस  हे माध्यमिक शाळांचे तर उर्वरीत 98 कॅडेटस हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. राजपथावरील पथसंचलनात देशभरातील 296 एनएसएस कॅडेटस सहभागी होणार आहेत.यासाठी राज्यातील निवड झालेल्या 25 कॅडेटसमधे 15 मुल तर 10 मुलींचा समावेश आहे. पंतप्रधान रॅलीत मानवंदना देण्यासाठी निवड झालेल्या 9 कॅडेटस मधे  6 मुले आणि 3 मुलींचा समावेश आहे.

            या शिबीरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. आतापर्यंत येथे पार पडलेल्या ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, पंतप्रधान रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटस सहभागी झाले असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. येथे सध्या बेस्ट कॅडेटसची स्पर्धा सुरु आहे. गेल्या 24 वर्षांपैकी 17  वेळा पंतप्रधान बॅनरचा बहुमान मिळवणारा महाराष्ट्र यावर्षीही हा बहुमान मिळवणार तसेच बेस्ट कॅडेटसचा पुरस्कारही राज्याच्याच वाटयाला येणार असल्याचा विश्वास महाराष्ट्राच्या संघाचे प्रमुख कर्नल निखिल कुलकर्णी आणि उपप्रमुख मेजर आर.आर.शिंदे यांनी व्यक्त केला आहे.    
             

                                                      00000

No comments:

Post a Comment