Wednesday, 13 January 2016

मुळा-मुठा नदी शुध्दीकरणासाठी केंद्र सरकारचा जपान सोबत सामंजस्य करार



नवी दिल्ली, 13 : पुण्यातील मुळा व मुठा नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारने जपानमधील जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (जायका) या कंपनीशी बुधवारी सांमजस्य करार केला. 

येथील इंदिरा पर्यावरण भवनात केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व जपानचे भारतातील राजदूत केंजी हिरामत्सु यांनी आज या करारावर सह्या केल्या. हा करार ऐतिहासीक असून उभय देशासांठी सहकार्याचा नवा अध्याय असल्याची भावना जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जारी केलेल्या देशातील प्रदूषित 302 नद्यांमधे पुण्यातून वाहणा-या मुळा-मुठा या दोन्ही नद्यांचा समावेश आहे. शहराच्या मध्य भागातून वाहणाऱ्या या नद्यांच्या शुद्धीकरणाची पुण्यातील नागरिकांकडून अनेक वर्षांपासून मागणी होत होती. महाराष्ट्र सरकाकरने राष्ट्रीय नदी संरक्षण योजनेअंतर्गत (एनआरसीपी) या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी प्रस्ताव पाठविला होता . 

केंद्र सरकार आणि जायका कंपनी दरम्यान झालेल्या या करारानुसार या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी जपानची जायका कंपनी एक हजार कोटींचे कर्ज देणार आहे. हे कर्ज फेडण्यासाठी 40 वर्षांची मुदत ठेवण्यात आली आहे. या करारांतर्गत 11 नवीन मल-जल शोधन यंत्राचे निर्माण केले जाणार आहे. यामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होईल. या नद्यांच्या शुद्धीकरणावर 990.26 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. पैकी  केंद्र सरकारचा वाटा 841.72 कोटी आणि पुणे महानगरपालिकेचा वाटा 148.54 कोटींचा असणार आहे. ही शुद्धीकरणाची योजना जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे या करारात म्हणण्यात आले आहे. पर्यावरण व वने आणि हवामानबदल मंत्रालयाचे सचिव अशोक लवासा यांनी या करारामुळे पुणे शहरातील नदी शुध्दीकरण प्रकल्पाला फायदा होणार असून उभय देशाचे संबंध दृढ होण्यास मदत होणार असल्याचेही म्हटले आहे.                                                 

0000

No comments:

Post a Comment