नवी
दिल्ली दि. १६ : तेल व वायू संवर्धन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी
महाराष्ट्राला शनिवारी देशातील सर्वोत्तम
राज्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस
मंत्रालयाअंतर्गत कार्य करणा-या पेट्रोलियम संवर्धन संशोधन मंडळाच्यावतीने येथील
डिआरडीओ भवनात आयोजित समारंभात केंद्रीय पेट्रोलीयम व गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान
यांच्या हस्ते हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय आणि अन्न व
नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव दीपक कपूर यांनी स्वीकारला. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला उपस्थित होत्या.
गेल्या वर्षभरात तेल व वायू संवर्धनासाठी उत्तम प्रकारे
कार्यकरणा-या राज्यांचा अभ्यास करून हा पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात
आला. केंद्र सरकराच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी
२०१५ मधे तेल व वायू संवर्धन पंधरवाडयापासून महाराष्ट्रातील विविध जिल्हयांमधे तेल
व वायू संवर्धनाच्या दिशेने कामास सुरुवात झाली. वर्षभरात मंत्रालय आणि जिल्हा
स्तरावरील कार्यालयांनी राज्यातील उद्योग, कृषी, वाहतूक, जैव इंधन, घरगुती वापर
आदी क्षेत्रात जनजागृतीसाठी विविध शिबीरांचे आयोजन केले.
तेल व वायू संवर्धनाबाबत राज्यातील सर्वसामान्य नागरीकांमधे जनजागृती
करण्यासाठी १,०२२ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. राज्यातील शेतक-यांमधे इंधन वापर व
तेल तसेच वायू संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी
४२० शिबीर आयोजित करण्यात आले. घरगुती गॅस वापरताना इंधन बचतीबाबत जागृती
करण्यासाठी राज्यांतील महिलांकरिता १२,५६१ शिबीरांचे आयोजन करण्यात आले. उद्योग
क्षेत्रात प्रदूषण कमी करून इंधन संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी २६१ शिबीरांचे
आयोजन करण्यात आले. राज्यातील शासकीय व खाजगी वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कमी
करणे व इंधन संवर्धनाबाबत जागृतीसाठी ६,१५३ शिबीरांचे यशस्वीपणे आयोजन करण्यात
आले. अशा प्रकारे एका वर्षात राज्यात एकूण २०,४१७ संवर्धन कार्यक्रम यशस्वीपणे
राबविले म्हणून मोठया राज्यांच्या गटात महाराष्ट्राची सर्वोत्तम राज्य म्हणून निवड
झाली.
या कार्यक्रमात राज्यातील उरण येथील तेल व वायू महामंडळाच्या
प्रकल्पाला तेल व वायू संवर्धनासाठी देशातील सर्वोत्तम आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त
संस्थेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्यावर्षी तेल व वायू संवर्धनाबाबत
जनजागृती करण्यासाठी देशभर घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धेत मराठी भाषेतील
सर्वोत्तम निबंधासाठी अहमदनगर येथील भाऊसाहेब फिरोदीया शाळेच्या इयत्ता नववीत
शिकणा-या प्रार्थना रानडेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वरूपात
प्रार्थनाला ३० हजार रूपये रोख, एक लॅपटॉप प्रदान करण्यात आला तसेच तीला केंद्रीय
पेट्रोलीयम व गॅस मंत्रालयाच्यावतीने
जपानमधे अभ्यास सहलीसाठी पाठविण्यात येणार आहे.
000000
No comments:
Post a Comment