नवी
दिल्ली, दि.18 : राष्ट्रीय
बाल शोर्य पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. देशातील २५ बालकांना शौर्य
पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातील ४ बालकांचा समावेश आहे.भारतीय
बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते २४ जानेवारी रोजी या बालकांना गौरविण्यात येणार आहे. शौर्य
पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा “भारत
पुरस्कार” नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याला मरणोत्तर जाहीर झाला आहे. जळगाव
जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे
आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला
आहे.
नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने
अंबाझरी तलावात बुडणा-या ४ मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे
लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला आपल्या ४ मित्रांसह अंबाझरी तलावजवळ
खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहीले. प्राणाची
पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि
चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच
गौरव पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी
त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गौरवची आई रेखा कवडूजी सहस्त्रबुध्दे हा
पुरस्कार स्वीकारणार आहे.
जळगाव जिल्हयातील
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणा-या निलेश रेवाराम भिल याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार
आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी बुलढाणा येथील ओंकार उगले हे कुटूंबियांसह
कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आले असता भागवत उगले हा ११ वर्षांचा मुलगा
मंदिरा समोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला.हे चित्र मंदिरात
दर्शनासाठी आलेल्या निलेश भिलच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही
विलंब न करता पाण्यात उडी घेऊन ओंकार उगलेचे प्राण वाचविले. निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत ५
वीत शिकत आहे.
वर्धा येथील सेलू तालुक्यातील सिंदी
रेल्वे येथील सहावीत शिकणा-या वैभव
रामेश्वर घंगारे ला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैभव हा २६ जुलै २०१४ ला गावातील नंदी नदी किनारी
मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत
वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. तो पुढे एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपजवळ
अडकला. तिथे उभ्या असणा-या लोकांपैकी सुहासच्या मदतीला कोणीच धजावले नाही मात्र
वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.
मुंबईतील
वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणा-या मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. २५ एप्रिल
२०१५ ला आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुटीत
आलेली मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता तलावात डुबत होती तीने आपल्या मैत्रीनीला
हात दिला पण तीला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने
पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन
मुलीचे प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीतच्या आई
वडीलांचे निधन झाले असून तो आत्याकडे राहणारा मोहीत वाळकेश्वर येथील महानगर पालीकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत
शिकत आहे.
३ मुली आणि २२ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य
पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या
पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने
शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि
अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत
पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते
00000
No comments:
Post a Comment