Thursday 28 January 2016

स्मार्टसिटीच्या पहिल्या टप्प्यात पुणे व सोलापूर शहरांची निवड



नवी दिल्ली, 28 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्टसिटी योजनेंतर्गंत घेण्यात आलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर शहारांनी बाजी मारली आहे. पहिल्या टप्प्यासाठी निवड झालेल्या देशातील पहिल्या २० शहरांच्या यादीत पुणे शहराने दुसरा तर सोलापूर शहराने नववा क्रमांक पटकवला आहे.

                   केंद्रीय शहरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांचा विकास करण्यासाठी देशातील १०० शहरांची निवड करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे. निवड झालेल्या शहरांना आपल्या शहराचा विकास नियोजन आराखडा तयारकरण्यासाठी प्रत्येकी २ कोटी रूपये देण्यात आले. त्यानंतर केंद्राकडे आलेल्या राज्यांच्या नियोजन आराखडयांची एक स्पर्धा घेण्यात आली. त्यानुसार  स्मार्टसिटी योजनेअंतर्गत  पहिल्या टप्प्यात २० शहरांची निवड करण्यात आली.

                   पुणे शहराची निवड करताना शहराच्या नियोजन आराखडयात भविष्याच्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या मध्यवर्ती पायाभूत सुविधांचे नियोजन, दिर्घकालीन पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन, पुणे शहराला देशातील सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनविण्याचे नियोजन, रोजगार  उपलब्ध करून देत शहराला मनुष्यबळाच्यादृष्टीने नवी ओळख निर्माण करून देणे, शहरातील सौदर्यीकरणात भर टाकण्याच्यादृष्टीने नदीकिनारे विकासीत करण्याच्या नियोजनासह विविधबाबींचा विचार करण्यात आला आहे.
                सोलापूर शहराच्या नियोजनात स्वच्छ, कार्यक्षम आणि विकसीत शहर तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी मांडण्यात आल्या आहेत. शहरवासियांसाठी  पायाभूत सुविधांनी सुसज्ज शाश्वत वातावरण तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. शहराचा गौरवशाली इतिहास येथे भेटदेणा-या प्रत्येकाच्या आकर्षणाचा बिंदू बनविण्यासाठी शहरातील १०४० एकराचा परिसर चिन्हीत करण्याचे नियोजन देण्यात आले आहे. यासोबतच  आकर्षक नगर रचना, पादचा-यांसाठी करून देण्यात आलेल्या रस्त्यांवरच शेतीमालाच्या विपणनाची व्यवस्था आदी बाबीं उपलब्ध करून देण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहराने तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरातील सेवाक्षेत्राचा विकास , जल संवर्धनासाठी मागणी व्यवस्थापन मापनव्यवस्था तयार करणे, शहर विकासासाठी विविध क्षेत्रांतून निधी उपलब्ध करणे आदी महत्वपूर्ण  नियोजनाच्या आधारावर या शहराची देशातील  स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.     
                      स्मार्टसिटी योजनेअंतर्गत देशातील उर्वरीत शहरांचा टप्याटप्याने विकास करण्यात येणार आहे .


                                                                        ००००००

No comments:

Post a Comment