नवी दिल्ली, 6 : प्रसार
माध्यमांच्या वाचक व दर्शकांच्या आवडी-निवडी, गरजा बदलत आहेत. त्यानुसार प्रसार माध्यमांनी
आपली शैली बदलली पाहिजे असे मत ज्येष्ठ पत्रकार
अशोक वानखडे यांनी मांडले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने येथील महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार दिनाच्या व परिचय केंद्राच्या
स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर, प्रमुख पाहुणे
म्हणून उपस्थि होते.
यावेळी वानखडे म्हणाले, आज संवादाची माध्यमे मोठया प्रमाणात
वाढताहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांमध्येही स्पर्धा वाढली आहे. यासोबतच प्रसार माध्यमांच्या
वाचक, दर्शकाच्या आवडी- निवडीही बदलल्या आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमांनी वाचकांच्या
आवडी निवडीचा विचार करून आपली शैली व सादरीकरण बदलले पाहिजे. लोकांवर विचार लादण्यापेक्षा
त्यांना हवी असलेली माहिती व विचार पोहचविण्याचे
काम प्रसार माध्यामांनी प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे. त्यासाठी भाषा व सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. हे बदल स्वीकारल्यास विकास पत्रकारितेला गती मिळेल असा विश्वासही त्यांनी
व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे
प्रमुख वक्ते तथा ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी
मराठी वृत्तपत्र सृष्टीत आदर्श पत्रकारितेचा पाया रोवला. त्यानंतर छापील माध्यमे, रेडीयो,
वृत्तवाहिन्या असा मराठी पत्रकारितेचा झालेला विकास कौतुकास्पद आहे. मात्र बदलत्या
काळात प्रसार माध्यमांमध्ये विकास पत्रकारितेसाठी जागा आहे का? असा प्रश्न निर्माण
झाला आहे. मोठया प्रमाणात समाज माध्यमांचे पेव फुटले आहे. यात प्रत्येक माध्यमांना
आपले अस्तित्व टिकविण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. पत्रकारांचा प्रत्यक्ष घटनास्थळी
जाण्याची, लोंकाशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याची वृत्ती कमी झाली असल्याची
खंत त्यांनी मांडली. अशा बदलत्या काळातही दिल्लीत सुरु असलेले ‘मयुर इन्फो मेल’, उत्तर
प्रदेशात दुध विक्रेत्यांनी चालविलेल्या ‘दुधिया एक्सप्रेस’ व देशाच्या आदिवासी भागात
सुरु असलेले छोटे दैनिके यांनी विकासाच्या बातम्या देण्याचा ओघ सुरुच ठेवला आहे. ही
सर्व परिस्थिती पत्रकारिता क्षेत्रात काम करणा-या प्रत्येकांनाच आत्मचिंतन करायला लावणारी
असल्याचे सांगत विकास पत्रकारितेसाठी पत्रकारांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपसंचालक दयानंद
कांबळे यांनी पत्रकार दिन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेचे महत्व विषद करून
पत्रकारितेतील विविध बदल व विकासातील प्रसारमाध्यमांच्या योगदानावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे
यांनी आभार प्रदर्शन केले.
0000
No comments:
Post a Comment