Saturday 30 January 2016

‘ व्हिजीट महाराष्ट्र’ वर्षाचा दिल्लीत शुभारंभ :दिल्ली हाट येथील ‘महाजत्रेचा’ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप



              
नवी दिल्ली, 30 : राज्यातील गड, किल्ले, समुद्र किनारे, लोकसंस्कृती बघण्यासाठी आमच्या राज्यात या  अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकर, देश व विदेशातील पर्यटकांना आज खुले निमंत्रण देत व्हिजीट महाराष्ट्र वर्षाचा शुभारंभ केला.

            दिल्ली हाट येथे राज्य शासनाच्या वतीने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या महाजत्रा या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , हस्तकला व लघु उद्योगाचे दर्शन घडविणा-या महोत्सवाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा नायर , महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव दौंड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्र शासनाने २०१७ हे वर्ष व्हिजीट महाराष्ट्र वर्षघोषित केले आहे. देशातील अग्रणी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. राज्याच्या विविध भागातील हस्तकला, लघु उद्योग आणि राज्याच्या वैविध्यपूर्ण लोक सांस्कृतीचे दर्शन घडविणा-या महाजत्रा महोत्सवाचे यशस्वी आयोजन राज्य शासनाच्या विविध विभागांनी केले आहे.राज्य सरकारने प्रथमच राजधानी ‍दिल्लीतील दिल्ली हाट या मध्यवर्ती व्यापार केंद्रात या महोत्सवाचे आयोजन करून दिल्लीकर,देश व विदेशातील पर्यटकांना राज्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यशासनाचा हा प्रयत्न यशस्वी झाला असून महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या व्हिजीट महाराष्ट्र वर्षा ची सुरुवात  आज  झाली  आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

                            पुरणपोळीचे मार्केटींग करणार – वल्सा नायर

महाराष्ट्राचे खास व्यंजन म्हणून ख्याती असलेली पुरणपोळी आणि वडापावया जिन्नसाला देश -विदेशात पोहचवू त्यासाठी देश विदेशातील हॉटेल्स कॅटरींग इन्स्टीटयूटस सोबत करार करू. देश विदेशात ज्या प्रमाणे इडली दोसा या व्यंजनांना मागणी आहे तशीच पुरणपोळी व वडापावला देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. महाजत्रेला दिल्लीसह देश विदेशातील पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. लघु उद्योजक व लोककलांना उत्तम व्यासपीठ मिळाले. या महोत्सवामुळे महाराष्ट्रातील पर्यटन व उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल  असे  राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा आर. नायर सिंह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.                     
                                   बहारदार  सांस्कृतिक कार्यक्रम

दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या काव्य पंक्तीचा अनुभव करून देणा-या व महाराष्ट्रच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर झाला. महाराष्ट्राच्या मराठमोळया कलाकारांनी कधी अंगावर रोमांच उभे केले तर कधी लावणीने रसिकांना खुलवून टाकले. महाराष्ट्राच्या लोककलांमधील वासुदेव, व्हलगरी दादा, कोळी नृत्य, ठाकर नृत्य, आदिवासी नृत्याच्या सादरीकरणाने रसिकांना खिळवून ठेवले. मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिक तर दिल्लीकरांचा ठेका चुकवणारा ठरला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणा-या बहारदार नृत्य, उत्तम सादरीकरण यामुळे  दिल्लीकर, देश विदेशातील पर्यटक  सुखावून तर गेले आणि  जय महाराष्ट्र गजर करायला मात्र ते विसरले नाहीत.

                 महाजत्रेत सहभागी लघुउद्योजक व कलाकारांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
 विविध प्रतिमा व प्रतिकांच्या माध्यमातून दिल्ली हाटमधे महाराष्ट्र उभे करणा-या प्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई, पैठणी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन या कलेचा प्रचार व प्रसार करणारे  जितेंद्र राजपूत, राजेंद्र अंकम यांचे महाजत्रा महोत्सवातील हस्तकला प्रदर्शनात सहभागी कलाकारांचे प्रातिनीधी म्हणून प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. महिला उद्योजक व अरोमा थेरपीच्या स्टॉल प्रतिनिधी श्रीमती विजया , महाजत्रेला भेट देणा-या पर्यटकांना महाराष्ट्र फुड या स्टॉलच्या माध्यमातून राज्याच्या व्यंजनांचा आस्वाद देणा-या शुभांगी चिपळुणकर यांचा सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांचे मराठमोळया पांरपारिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारावर त्यांच्या हस्ते श्रीगणेशाची आरती करण्यात आली व  शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करून  मुख्यमंत्र्यांनी  विविध स्टॉल्सला भेट दिली. 

राज्य पर्यटन व सांस्कृतिक संचालनालयाच्या सचिव वल्सा नायर यांनी गणराची प्रतिमा देवून मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.                                               
                                           00000



         

No comments:

Post a Comment