Sunday, 24 January 2016

नागपूर शहराच्या विकासासाठी फ्रांससोबत महाराष्ट्राचा करार






चंदीगढ, दि.24 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजने अंतर्गत नागपूर शहराचा विकास करण्यासाठी फ्रांसीसी विकास संस्था (एएफडी) आणि महाराष्ट्र सरकार यांच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सीस्को हॉलंड यांच्या उपस्थितीत रविवारी महत्वपूर्ण करार झाला.  

            फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीला आजपासून सुरुवात झाली असून उभय देशांदरम्यान व्यापाराला चालना देण्यासाठी चंदीगढ शहरात आज भारत-फ्रांस व्यापार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत महाराष्ट्र आणि फ्रांसीसी विकास संस्थे दरम्यान  द्विपक्षीय करार झाला. महाराष्ट्रासोबतच पॉण्डेचेरी आणि चंदीगढ शहराच्या विकासासाठीही असा करार करण्यात आला.

            या करारानुसार नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वास्तू शिल्प व वारसा क्षेत्राचा विकास, नवीन व नवीकरणीय उर्जाक्षेत्र विकास आदी क्षेत्रांमधे फ्रांस तांत्रिक मदत देणार आहे. फ्रांसमधून याकामासाठी येणा-या तंत्रज्ञ व तज्ज्ञांचा सर्व खर्च फ्रांसीसी विकास संस्था उचलणार आहे.                                 
                                       पंतप्रधानांनी मानले आभार 

भारत-फ्रांस व्यापार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आधुनिक शहर निर्माण करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेल्या पावलांची माहिती दिली. तसेच, नागपूरसह देशातील तीन शहरांमधे स्मार्टसिटी निर्माण करण्यासाठी फ्रांसने घेतलेल्या पुढाकाराबाबत आणि आज उभय देशांमधे याबाबत झालेल्या द्वीपक्षीय कराराबाबत फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले. या परिषदेत भारत व फ्रांसच्या कंपन्यांमधे एकूण १६ करार झाले.
                                 ००००००

No comments:

Post a Comment