Sunday, 24 January 2016

पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्रदान ; नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्देला मरणोत्तर ‘भारत पुरस्कार’






नवी दिल्ली, दि.24 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी महाराष्ट्रातील 4 शूर बालकांसह देशातील 25 बालकांना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानीत केले.

            पंतप्रधानांच्या 7, रेस कोर्स या निवासस्थानी आयोजित शानदार कार्यक्रमात आज 3 मुली आणि 22 मुलं अशा एकूण 25 बालकांना ‘वर्ष 2015’ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे पंतप्रधानांच्या हस्ते वितरण करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यावेळी उपस्थित होत्या.

            याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित बालकांना संबोधित केले. ते म्हणाले, पुरस्कार प्राप्त बालकांच्या प्रसंगावधान व साहसामुळे इतरांचे प्राण वाचले. त्यांच्या या साहसाचे कौतुकच आहे. यशाने हुरळून न  जाता आपला विकास करून देशाच्या विकासात सहभागी होण्याचे आणि साहस हा आपला स्वभाव भाव बनविण्याचे आवाहन  त्यांनी,  उपस्थित बालकांसह देशातील बालकांना केले. मनेका गांधी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा भारत पुरस्कार नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याला मरणोत्तर जाहीर होता. गौरवची आई रेखा आणि वडील कवळू सहस्त्रबुध्दे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जळगांव जिल्हयातील कोथळीच्या निलेश भील, वर्धा जिल्हयातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी यालाही राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

            नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणा-या 4 मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला मरणोत्तर भारत पुरस्कार  जाहीर झाला होता.  
            जळगांव जिल्हयातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणा-या निलेश रेवाराम  भिल  याने कोथळी येथे संत मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेल्या 11 वर्षांच्या मुलाला मंदिरा समोरच्या घाटावर बुडताना वाचविले.  निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत पाचवीत शिकत आहे.      

            वर्धा येथील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणा-या  वैभव घंगारे हा नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.   

            मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणा-या  मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना  बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. तलावात आंघोळीसाठी गेलेली मुलगी तलावात बुडत होती तिने आपल्या मैत्रीनीला हात दिला पण तिला पोहता येत नसल्याने मैत्रीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने 25 फुट खोल तलावात उडी घेऊन  मुलीचे प्राण वाचविले व तिला नजीकच्या इस्पितळात भरती केले. मोहीत वाळकेश्वर येथील  महानगर पालीकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे. 

            प्रजासत्ताकदिनी राजपथावर होणा-या पथसंचलनात ही बालके सहभागी होणार आहेत. पुरस्कार प्राप्त बालकांनी याआधी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल नजीब जंग यांची  भेट घेतली आहे .

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणा-या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या आधी पंप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते 

         00000

No comments:

Post a Comment