Tuesday, 2 February 2016

जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत मनरेगाचे उत्तम काम अरूण जेटली





नवी दिल्ली, 02 : महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीत मनरेगा अंतर्गत उत्तम कामे झाली अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी कौतुक केले.   
                      
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने (मनरेगा)च्या दशकपूर्ती निमित्त केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आज राष्ट्रीय मनरेगा संमेलनाचे उदघाटन श्री. जेटली यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह, राज्यमंत्री सुदर्शन भगत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता राज्यमंत्री द्वय कृपालसिंह यादव आणि निहालचंद यावेळी मंचावर उपस्थित होते.   

अरूण जेटली म्हणाले, महाराष्ट्र शासनाने राज्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना उत्तम प्रकारे राबविली. या योजनेअंतर्गंत राज्यातील ६,१८० गावांमधे १.२० लाख काम झाले असून यातील बहुतांश कामे ही लोकसहभाग व मनरेगा योजनेअंतर्गत करण्यात आली. केंद्र सरकार मनरेगाचा विस्तार करणार असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंह म्हणाले, देशातील ८ कोटी ग्रामीण जनतेनी मनरेगाचा लाभ घेतला असून यावर्षी ही संख्या वाढून ११ कोटी पर्यंत पोहचविण्याचे उदिष्टय आहे. १८ लाख मनरेगा कामगारांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल असेही ते म्हणाले.

याकार्यक्रमात ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने प्रकाशीत करण्यात आलेल्या वार्षीक पुस्तीकेचे प्रकाशन श्री. जेटली यांच्या हस्ते करण्यात आले.मनरेगादिनानिमित्त विज्ञानभवनात लावण्यात आलेल्या प्रदर्शीनीची पाहणीही श्री. जेटली यांनी केली.

राज्याचे मनरेगा आयुक्त अभय महाजन, लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, रोजगार हमी योजनेचे उपसचिव प्रमोद शिंदे, लातूर आणि  अमरावती जिल्हापरिषदांचे मुख्यकार्यकारी अधिकारी,राज्यातील निवडक पंचायतसमितीचे सभापती व संरपंच, कामगार यांच्यासह राज्यातील ६५ प्रतिनिधींनी या संमेलनात सहभाग घेतला.   
                                     00000        
सूचना : सोबत छायाचित्र जोडले आहेत.



No comments:

Post a Comment