Friday, 5 February 2016

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वन सदृश्य जमीनीचे क्षेत्र कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल : प्रकाश जावडेकर


नवी दिल्ली, 5 : सर्वाधिक वन सदृध्य जमीन असलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जमीनीचे क्षेत्र कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले असून याबाबत मुंबई येथे बैठकही घेण्यात येईल, अशी माहिती राज्य वित्त मंत्री तसेच सिंधुदूर्गाचे पालक मंत्री दिपक केसरकर यांना आज दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणाशी संबंधित विविध प्रश्नासंदर्भात श्री केसरकर यांनी मंत्री श्री जावडेकर यांची इंदिरा पर्यावरण भवन येथे भेट घेतली. महाराष्ट्रातील एकूण वन सदृश्य जमीनीपैकी 80 टक्के जमीन एकटया सिंधुदूर्ग जिल्हयात आहे. यामुळे स्थानिक जनतेची घरे, गायीचे गोठे, देखील वन सदृश्य जमीनीमध्ये गणली जातात. याशिवाय याठीकाणी मोठी नागरी वसाहत उभारणे, प्रदूषणकारी उद्योग, व्यवसायीक खनन करण्यास बंदी आहे. मात्र या भागात खड़ी, जांभा दगड फोड, छोटया क्रशर आदींवरील बंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे रोजगाराची नवी साधने उपलब्ध होत आहेत. वन सदृश्य जमीन क्षेत्र कमी झाल्यास स्थानिकांना रोजगाच्या अधिक संधी उपलब्ध होतील, असेही श्री केसरकर यांनी सांगितले.
राज्यराणी एक्सप्रेसचे डबे वाढविण्यात यावे : दिपक केसरकर
कोकणातून धावणारी  व राजधानी मुंबईला जोडणारी एकमेव रेल्वे राज्यराणी एक्सप्रेसला अतिरीक्त दोन डबे जोडण्यात यावे, या मागण्यांसाठी श्री दिपक केसरकर यांनी आज  केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेतली.
रेल्वे मंत्रालयात रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांची भेट घेऊन केसरकर यांनी  राज्यराणी एक्सप्रेसला अतिरीक्त दोन डबे जोडण्यात यावे अशी मागणी केली. दादर सेंट्रल ते सावंतवाडी अशी धावणारी व कोकणातील महत्वाच्या तिर्थ, पर्यटन व व्यापारी स्थळांना मुंबईशी जोडणारी एकमेव दैनिक रेल्वे गाडी आहे. सध्या या गाडीला १३ डबे असून कोकणातून मुंबईकडे व मुंबईहून कोकणाकडे मोठया प्रमाणात जाणा-या प्रवाशांची भिस्त या गाडीवर आहे. गाडीला डबे कमी असल्याने प्रवाशांची गैरसोय होते, त्यामुळेच स्थानिकांकडून अतिरीक्त डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत असल्याचे केसरकर यांनी सांगून रेल्वे मंत्र्यांना हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. दादर सेंट्रल ते सावंतवाडी असे ४९७ किमी अंतर आहे.
सिंधुदुर्ग येथे येत्या 18 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या संसाधन आधारित नियोजनावर जागतिक परिषदेचे निमंत्रणही श्री केसरकर यांनी रेल्वे मंत्र्यांना यावेळी दिले.
सिंधुदूर्गात अन्न प्रक्रिया केंद्र उभारण्यास परवानगी मिळावी :  केसरकर
पंचशील भवन येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत बादल कौर यांच्याशी झालेल्या भेटीत सिंधुदूर्ग येथे अन्न प्रक्रीया केंद्र उभारण्याबाबतची श्री केसरकर यांनी मागणी केली. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले. सिंधुदूर्ग जिल्हा हा नैसर्गिक साधन संपत्तीसह फलोत्पादनातही समृद्ध आहे. काजू, जगप्रसद्धि हापूस आंबा, केळी, नारळ आणि इतर फळही येथे पिकतात. मात्र या क्षेत्रात एकही अन्न प्रक्रिया केंद्र नसल्याने प्रवासा दरम्यान फळांना किळ लागणे, खराब होणे, अशा समस्यांना सामोरे जावे लागते व आर्थिक नुकसान उचलावे लागते. या ठिकाणी अन्न प्रक्रिया केंद्र उभारल्यास एकाच ठिकाणी उत्पादन आणि प्रक्रिया अशा दोन्ही गोष्टी होतील. सोबतच  स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असे श्री केसरकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment