Friday, 5 February 2016

महाराष्ट्रातील संस्थेला जैवतंत्रज्ञान समाज विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार




नवी दिल्ली, 05 : राज्यातील सातारा आणि रायगड जिल्हयात उत्तम कार्य करणा-या श्रमजीवी जनता सहायक मंडळ या संस्थेला विज्ञान-तंत्रज्ञान व भूविज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याहस्ते राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान समाज विकास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

        विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने येथील विज्ञानभवनात आयोजित द्विदीवसीय जागतिक जैवतंत्रज्ञान परिषदेचे आज उदघाटन झाले. याप्रसंगी  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह , वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सितारमन मंचावर उपस्थित होत्या.
            जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून समाजातील आर्थिक आणि सामाजिकदृष्टया मागास घटकांच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्यकरणा-या देशातील  एक व्यक्ती व एका संस्थेला जैवतंत्रज्ञान विभागाच्यावतीने
दरवर्षी राष्ट्रीय जैवतंत्रज्ञान समाज विकास पुरस्कार  देऊन गौरविण्यात येते. संस्थांच्या गटातून वर्ष २०१५ च्या जैवतंत्रज्ञान समाज विकास पुरस्काराने महाराष्ट्रातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ या संस्थेला गौरविण्यात आले.  २ लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

        बाळासाहेब कोळेकर यांच्या पुढाकाराने १९७७ मधे श्रमजीवी जनता सहायक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. या गैरसरकारी संस्थेने राज्यातील पश्चिम घाटात वास्तव्य करणा-या भटक्या जमातीतील युवकांना शिक्षीत करून त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे उल्लेखनीय कार्य केले. सातारा आणि रायगड जिल्हयातील भटक्या जमातील मुलांना शिक्षीत करण्यासाठी संस्थेने १५० शाळा उभारल्या. संस्थेने सहकाराच्या माध्यमातून गवळी समाजातील बांधवांना दूध संघ उभारून दिले. या कार्याचा विस्तार करत मासेमारी, सागवान व बांबू या वनोत्पादनावर गुजरान करणा-या मजुरांनाही सहकार तत्वावर या वनोत्पादनातून उद्योगांचा विकास करण्यास मार्गदर्शन केले. संस्थेने विविध क्षेत्रात ३६ सहाकारी संघ स्थापन केले ज्याचा लाभ ९,२०० कुटुंबांना झाला. यात २१५० सदस्यांचा सहभाग असलेला श्रमजिवी महिला उद्योजक संघ हा उल्लेखनीय होय. कातकरी आदिवासी समाजातील मासेमारी करणा-या महिलांचे १२० बचतगट उभारले आहे त्यात २५०० महिलांचा सक्रीय सहभाग आहे. संस्थेने ५०० गावांतील ३५,००० धनगर व गवळी कुटुंबांपर्यंत पोहचून  बाल विवाह रोखण्याबाबत जनजागृतीचे कार्य केले व या समाजातील मुलींना या अनिष्ट प्रथेबाबत शिक्षीत केले.  

                                           00000        






No comments:

Post a Comment