Wednesday, 3 February 2016

महाराष्ट्रातील ५ विद्यार्थ्यांना ‘राष्ट्रीय गुणवत्ता’ पुरस्कार




नवी दिल्ली, 03 : इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत प्रथम येणा-या महाराष्ट्रातील ५ विद्यार्थ्यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

          केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने येथील इंडिया हॅबीटॅट सेंटरच्या स्टेन सभागृहात आयोजित राष्ट्रीय निबंध स्पर्धा आणि गुणवत्ता पुरस्कार २०१५ वितरण समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री द्वय कृष्णपाल गुर्जर आणि विजय सांपला, सामाजिक न्याय विभागाच्या सचिव अनिता अग्नीहोत्री, अपरसचिव अरूण कुमार, सहसचिव बी.एल. मिना आणि डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानचे संचालक जी.के.द्विवेदी यावेळी मंचावर उपस्थित होते.

          या कार्यक्रमात देशातील विविध राज्यातून गुणवत्ता यादीत प्रथम येणा-या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. महाराष्ट्रातून दहावीच्या गुणवत्ता यादीत कलाशाखेतून प्रथम आलेला श्रीपतराव कोसले हायस्कुल उस्मानाबादचा विद्यार्थी राहुल बनसोडे आणि विज्ञान शाखेतून प्रथम आलेला होलीसिटी हायस्कुल नांदेडचा विद्यार्थी सार्थक अक्कुलवार  यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच बारावीच्या गुणवत्ता यादीत कला शाखेतून प्रथम येणारा लातूरच्या दयानंद कला महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल डोंगरे, विज्ञान शाखेतून प्रथम आलेल्या नागपूर येथील डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी प्रांजली खांडेकर आणि ऋतुजा बडगे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ६० हजार रूपये रोख आणि पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

           यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री द्वय कृष्णपाल गुर्जर आणि विजय सांपला यांनी उपस्थितांना संबोधित केले.

                                                     00000        



No comments:

Post a Comment