Monday 28 March 2016

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा : ‘रिंगण’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट





नवी दिल्ली, 28 : 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा सोमवारी झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान सर्वात महागडा चित्रपट बाहुबली द-बिगिनिंग या तेलगू चित्रपटला मिळाला. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रिंगण तर सर्वोत्कृष्ट गायक महेश काळे यांची कट्यार काळजात घूसली या चित्रपटाच्या गायनासाठी निवड करण्यात आली.
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अरूण जेटली यांना आज 63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या तीन सदस्यीय परीक्षकांच्या गटाने पुरस्कार विजेत्यांची यादी प्रदान केली. यानंतर राष्ट्रीय माध्यम केंद्र येथे परीक्षक मंडळाचे अध्यक्ष रमेश सिप्पी यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटांनी मारली बाजी

63 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठी चित्रपटाने बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट रिंगण ठरला तर सर्वोत्कृष्ट गायक महेश काळे यांची कट्यार काळजात घूसली या चित्रपटाच्या गायनासाठी निवड झाली आहे. उत्कृष्ट शैक्षणिक लघूपटासाठी मिथुनचंद्र चौधरी यांच्या पायवाट या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. अमोल देशमुख यांच्या औषध या लघूपटाला सर्वोत्कृष्ट लघूपटासाठी निवडण्यात आले आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटया चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची चित्रपटातील विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी निवड करण्यात आली आहे.



बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांची पिकू चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना रणावतला तनू वेड्स मनू रिटर्न्स या चित्रपटातील अभियासाठी निवड करण्यात आली आहे. सलग दुस-यांदा कंगना रणावतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार आहे. मागच्या वर्षी क्वीन्स या चित्रपटाकरिता कंगणा रणावतला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून निवडण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून दम लगा के हैशा याची निवड करण्यात आली. बजरंगी भाईजान या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या नृत्यासाठी नृत्यदिग्दर्शक रिमो डिसुझा यांची निवड करण्यात आली. संवाद लेखनाकरिता पिकू साठी जुही चतुर्वेदी तर तन्नू वेड्स मन्नू रिर्टन्स साठी हिमांशू शर्मा या दोघांची निवड करण्यात आली. गीतकार वरूण ग्रोव्हर यांना दम लगा के हैशा या चित्रपटातील मोह मोह के धागे या गाण्याकरिता निवड करण्यात आली आहे. सुजीत सावंत यांची बाजीराव मस्तानी’  चित्रपटातील प्रोडक्शन डिसाइनसाठी निवड करण्यात आली आहे. बेस्ट ज्यूरीसाठी कल्की यांची निवड करण्यात आली. बाहुबली द-बिगिनिंग या चित्रपटाची विशेष पुरस्काराकरीताही निवड करण्यात आली आहे. चित्रपट प्रेमी राज्य म्हणून गुजरात राज्याची निवड करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment