Monday, 28 March 2016

महाराष्ट्रातील ९ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान























नवी दिल्ली, दि. २८ : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मान्यवरांचा यात समावेश आहे.  
  
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणा-या देशातील ५६ मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून एका मान्यवरांस मरणोत्तर पद्मविभूषण, २ मान्यवरांना पद्मभूषण तर ६ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी उपराष्ट्रती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी ,केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
             पद्म पुरस्कारांचे  वितरण दोन  टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात ५६ मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. देशाच्या उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिवंगत प्रसिध्द उद्योजक धिरूभाई अंबानी यांना पद्म पुरस्कारातील सर्वोच्च मानला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. धिरुभाई अंबानी यांच्या पत्नी कोकीलाबेन अंबानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आज एकूण ५ पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
            या समारंभात एकूण ८ पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील २ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिध्द अभिनेते अनुपम खैर यांना तर वास्तूशास्त्रातील उल्लेखनीय योगदानासाठी हाफिज कॉन्ट्रक्टर यांना सन्मानीत करण्यात आले.

या समारंभात एकूण ४३ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील ६ मान्यवरांचा यात समावेश आहे. कला व चित्रपट क्षेत्रातील उत्तम योगदानासाठी प्रसिध्द दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिध्द अभिनेते अजय देवगण यांना सन्मानीत करण्यात आले. जाहीरात व संवाद क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी  पियुष पांडे यांना, व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  दिलीप संघवी  यांना, शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रगत शेतकरी सुभाष पाळेकर आणि विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रा.(डॉ.) गणपती दादासाहेब यादव यांना सन्मानीत करण्यात आले.

या कार्यक्रमात कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्रातील धुळे जिल्हयात जन्मलेले प्रसिध्द शिल्पकार राम सुतार यांना पद्मभूषण पुरस्काराने तर गोव्यातील प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडीत तुळशीदास बोरकर यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ११२ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण १६ मान्यवरांचा समावेश आहे, पैकी एक मरणोत्तर पद्मविभूषण, ५ मान्यवरांना पद्मभूषण तर १० मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले.
                                                                  00000000

No comments:

Post a Comment