नवी
दिल्ली, दि. २९ : लेखकांनी
चोकोरीबध्द लेखन सोडून वेगवेगळया विषयांच्या मुळाशी जात लेखन करण्याचे आवाहन महाराष्ट्र
राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, लेखक तथा प्रकाशक बाबा भांड यांनी
केले.
श्री. भांड
यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी आयोजित अनौपचारिक
गप्पांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘आपल्या अवती-भोवती
असे असंख्य विषय आहेत जे साहित्यापासून मैलो दूर आहेत. त्यांचा अभ्यास करून साहित्याच्या
विविध प्रकारांमधून ते वाचकांपर्यंत पोहचले पाहीजे त्यासाठी लेखकाने आपल्या आवडीचा
विषय निवडून यासंदर्भात काम करण्याची गरज असल्याचे’ त्यांनी
यावेळी सांगितले. श्री. भांड यांनी बडोदा संस्थानचे प्रमुख सयाजीराव महाराज
गायकवाड यांच्या कार्यासंबंधित महत्वाच्या फाईल्स लंडन येथून आणल्या असून त्यावर
ते लेखन करीत आहेत. सयाजीराव महाराजांनी आपल्या संस्थानामधे कित्येक वर्षांपूर्वीच
सुरु केलेले सक्तीचे प्राथमिक शिक्षण, त्यांनी सुरु केलेली ग्रंथाली चळवळ,
धार्मिक, शेती व सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान आदींची माहिती सामान्य
वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी ते लेखन करीत आहेत.
या अनौपचारीक गप्पांमधे औरंगाबाद जिल्हयातील
पैठन तालुक्यातील वडजी गावापासून बाबा भांड यांचा लेखक म्हणून झालेला प्रवास. ‘लागेबांधे’ या पहिल्यावहील्या पुस्तकाच्या
प्रकाशनासाठी त्यांचे गुरु प्रसिध्द साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी दिलेले
प्रोत्साहन व मार्गदर्शन ते त्यांनी
लिहीलेल्या ८५ पुस्तकांबद्दल या गप्पांमधून उपस्थितांना माहिती मिळाली. त्यांनी यावेळी साहित्याच्या विविध
प्रकारांवर व लिखानावर प्रकाश टाकला.
परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी
अंजू निमसरकर-कांबळे यांनी श्री. भांड यांचे पुष्पगुच्छ व परिचय केंद्राचे प्रकाशने
भेट देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले.
परिचय केंद्राचे अधिकारी -कर्मचारी , ग्रंथालयाच्या अभ्यासिकेचा लाभ घेणारे
विद्यार्थी, वाचक व अभ्यासक यावेळी उपस्थित होते.
00000000
No comments:
Post a Comment