Friday, 11 March 2016

राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन भाषा तज्ज्ञांचा सन्मान


नवी दिल्ली, 11 : राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील तीन भाषा तज्ज्ञांचा सन्मान आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला.
केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील पं.श्रीकृष्णशास्त्री काशीनाथशास्त्री जोशी (कोडणीकर), डॉ. प्रसाद प्रकाश जोशी आणि डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
साता-याचे पं. श्रीकृष्णशास्त्री जोशी (कोडणीकर) यांना संस्कृत भाषा लोकप्रिय करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी गौरविण्यात आले. श्री जोशी यांनी न्यायशास्त्र, काव्य, वेदांत्तसार आणि  ऋग्वेदाचे अध्यन केले. कर्नाटकाच्या संकेश्वरपीठातून न्यायरत्न, पुराणशास्त्र-कोविद तथा ब्राह्णणबहुभाषिक संघ, मैसुरामधील अवधूतदत्तपीठातून शास्त्रनिधि, कराडमधून ब्रह्यश्री पदवी प्राप्त केली. 45 वर्षापासून साता-यातील शंकराचार्य वेदशास्त्र शाळेमध्ये ते अध्यापन कार्य करीत आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम घेऊन ते पुराण प्रवचन, देवी भागवत पारायण, रामायण कथा आणि भावगत कथेचे वाचन करतात. संस्कृत भाषेला जोपासण्याचे तसेच वाढविण्याचे काम श्री जोशी करीत आहेत.
डॉ. प्रसाद जोशी यांनी पुण्यातील भारतीय  विद्या भवनव्दारे आयोजित संस्कृत भाषा कोविद ही परीक्षा उत्तीर्ण केली. यासह श्री जोशी यांनी वैदिक व्याकरणामधेही विद्यावारिधि ही पदवी प्राप्त केली. पुण्यातील वेद शास्त्रोत्तेजक  सभेतून संस्कृत चूड़ामणि आणि पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयातून भाषाशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. फर्ग्यूसन कॉलेजमध्ये श्री जोशी यांनी 7 वर्ष संस्कृतचे विभाग प्रमुख म्हणून कार्य केले असून यादम्यान श्री जोशी यांनी संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध चर्चा सत्र, परिषदेत, कार्यशाळेत भाग घेतला. आतापर्यंत श्री जोशी यांचे 17 शोध प्रबंध 10 आलेख प्रकाशित झाले आहेत. श्री जोशी यांनी वेदिक एओरिस्ट एण्ड पाणिनि या नावाने ग्रंथ लिहीला आहे. याशिवाय एन आडटलाइन ऑफ प्राकृत लिटरेचर ग्रंथाचे अनुवादही केले. मागील 16 वर्षापासून डेक्कन कॉलेज विद्यापीठाव्दारे संचालित संस्कृत शब्दकोश समितीशी ते जुळलेले आहेत. सध्या ते डेक्कन कॉलेज विद्यापीठामध्ये संस्कृत व कोश शास्त्र विभागात सहायक सम्पादक म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. धम्मदीप पंढरी वानखेडे हे पाली भाषेतील तज्ञ आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पालीभाषेत एम.ए. आणि राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएच-डी केली आहे. श्री वानखेडे यांनी बौध्द तर्कशास्त्राची रूपरेषा मराठीत तर विश्व क्षिजित पर बौध्दधर्म हिंदीत पुस्तक लिहीली आहे. यासह परमत्थदीपनी, अनुदीपनी, आणि निरत्तिदीपनी या बौध्द धर्माशी संबधीत महत्वपुर्ण ग्रंथाचे संपादन केले आहे. पाली व बौध्द अध्ययन संस्था गुलबर्गा विद्यापीठ, कलबुर्गि कर्णाटक येथे अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment