नवी दिल्ली, ०९: मुंबई
येथे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाच्यावतीने
आयोजित करण्यात येणा-या ‘भारत समुद्र परिषद २०१६’ च्या माध्यम मोहिमेचे उदघाटन बुधवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व
जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
येथील
राष्ट्रीय माध्यम केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी यांनी ही
घोषणा केली. जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार आणि राष्ट्रीय माध्यम
केंद्राचे महासंचालक ए.पी.फ्रँक नरोहा यावेळी उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, भारतीय समुद्र
क्षेत्रात गुंतवणुकीला मोठया प्रमाणात संधी आहे. ‘भारत समुद्र
परिषद २०१६’ च्या माध्यमातून जगभरातील गुंतवणूकदारांना आमंत्रित
करून देशाच्या समुद्र क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न आहे. आज या परिषदेच्या
माध्यम मोहिमेचा अधिकृत आरंभ झाल्याचे सांगत गडकरी म्हणाले, महिनाभर चालणा-या
माध्यम मोहिमेच्या माध्यमातून देश आणि विदेशात प्रिंट, इलेक्ट्रॉनीक आणि आऊट डोअर
पब्लिसीटीच्यामाध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोहचविण्यात येणार आहे. भारतीय समुद्र
क्षेत्रात असलेल्या गुंतवणूक क्षमतेकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या
उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. समुद्र क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे देशात
मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून देशाच्या अर्थव्यवस्थेला गती येणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘भारत समुद्र परिषद
२०१६’ ची माहिती देण्यासाठी www.maritimeinvest.in या अधिकृत संकेतस्थळाचे गेल्या महिन्यात मुंबईत आयोजित ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात उदघाटन करण्यात आले. भारतीय
समुद्र क्षेत्राच्या क्षमतांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कोलकत्ता,
चैन्नई, हैद्राबाद आणि अहमदाबाद येथे रोड शो चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहितीही
गडकरी यांनी दिली. समुद्र क्षेत्रात अग्रेसर असणा-या देशांच्या दुतावासांमधे
अधिका-यांसोबत बैठका करून या परिषदेत त्यांचे प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी प्रयत्न
करण्यात येत आहेत. दक्षिण कोरिया, नॉर्वे, सिंगापूर, संयुक्त अरब अमीरात, इंग्लड, युरोपीयन युनीयन, फ्रांस हे समुद्र क्षेत्रात
आघाडीवर असलेले देश या परिषदेत सहभागी होणार आहेत.
मुंबईच्या गोरेगाव भागातील बॉम्बे
कव्हेंशन अँड ऐक्सिबीशन सेंटर मधे दिनांक १४ ते १६ एप्रिल २०१६ दरम्यान ‘भारत समुद्र परिषद
२०१६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. रिपब्लिक ऑफ कोरिया या
परिषदेचा सहभागी देश असणार आहे. या परिषदेत सहभागी देश व कंपन्यांना भारतीय समुद्र
क्षेत्रात व्यवसाय व गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहे. दिनांक १४ आणि १५
एप्रिल रोजी या परिषदेत विविध करार होणार आहेत. जहाजबांधणी, जहाज दुरूस्ती,जहाज
पुनर्बांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि बंदर विकास, बंदर आधारित औद्योगिक विकास
आदींबाबत प्रदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन
या परिषदेत करण्यात येणार आहे.
००००००००
No comments:
Post a Comment