Wednesday 16 March 2016

महाराष्ट्रातील सातारा आणि नंदूरबार जिल्‌ह्यांना ‘कायाकल्प’ पुरस्कार

         

नवी दिल्ली, 16 : रूग्णालयातील स्वच्छतेसाठी  कायाकल्प अंतर्गत देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये राज्यातील सातारा जिल्हा रूग्णालयाला प्रथम आणि नंदूरबार जिल्हा रूग्णालयाला व्दितीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने येथील नवी दिल्ली महानगर पालिका सभागृहात या पुरस्कार वितरण सोहळाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव बी.पी. शर्मा, अतिरीक्त सचिव आरोग्य विभाग डॉ. अरूण कुमार पांडा, आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद,  सह सचिव (पॉलीसी) मनोज झलाणी उपस्थित होते.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर देश पातळीवरील रूग्णालय तसेच राज्यपातळीवरील रूग्णालयातील स्वच्छतेबाबत कायाकल्प ही योजना 15 मे 2015 ला घोषीत केली. यातंर्गत रूग्णालयातील स्वच्छतेबाबत विविध मापदंड ठेवण्यात आले. जसे रूग्ण तपासणी, रूग्णांच्या मुलाखती, रूग्णालयाची आतील तसचे परीसर स्वच्छता, वैद्यकिय जैविक कच-याची विल्हेवाट, रूग्णालयातील कर्मचा-यांच्या मुलाखती, कर्मचा-यांचे मुल्याकंन असे विविध स्तरावर तपासणी करण्यात आली. या करिता रूग्णालयातील प्रमुखांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. ज्या रूग्णालयांनी सर्व मापदंडांना पूर्ण केले त्यांना आज पुरस्कृत करण्यात आले.
राज्यातील सातारा जिल्हा रूग्णालयाला प्रथम पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप 50 लाख रूपये रोख, कायाकल्पचे मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे आहे. उपविजेतेचा पुरस्कार नंदूरबार जिल्हा रूग्णालयाला मिळाला. हा पुरस्कार जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीकांत भोये यांनी स्वीकारला. या पुरस्काराचे स्वरूप 20 लाख रूपये रोख, कायाकल्पचे मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे आहे. आरोग्य विभागाचे सचिव बी.पी. शर्मा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.


सातारा जिल्ह्याचे तत्कालीन शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी  पुरस्कार प्राप्ती नंतर मनोगत व्यक्त करत सांगितले, आम्ही केलेल्या कार्याला योग्य न्याय मिळाला. या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा रूग्णालयाने  राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली.

नंदूरबार सारख्या दूर्गम भागातील जिल्हा रूग्णालयाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे आनंद झाला आहे. तसेच दूर्गम भागातील रूग्णालयही स्वच्छतेची सर्व मापदंड पाळतात हा संदेश राष्ट्रीय पातळीवर पोहचल्याचे’, आपल्या मनोगतात डॉ. श्रीकांत भोये म्हणाले.

No comments:

Post a Comment