Tuesday 15 March 2016

खासदार संजय जाधव यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट



नवी दिल्ली दि. १५ : मराठवाडयासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना मी हार-पुष्पगुच्छ कसे स्वीकारणार ?.’ हा भावूक स्वर ऐकूण मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी-कर्मचारी आणि उपस्थित पत्रकार यांना त्यांच्या संवेदनशील स्वभावाची प्रचिती आली. प्रसंग होता परभणी जिल्हयाचे खासदार संजय जाधव यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला दिलेल्या भेटीचा.

            महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालया अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राला लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक, विद्यार्थी आदींचा सतत राबता असतो. कार्यालयाच्या शिरस्त्या प्रमाणे येथे येणा-या पाहुण्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्याची परंपरा आहे. आज कार्यालयास खा. संजय जाधव यांनी भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी  श्री. जाधव यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ देऊ केले तेव्हा, श्री. जाधव यांनी त्यास नकार दिला. ते म्हणाले, मराठवाडयासह राज्यात दुष्काळाची परिस्थिती  असल्याने मी स्वागताचा बडेजाव स्वीकारने बंद केले आहे, हे ऐकूण उपस्थितांना श्री. जाधव यांच्या संवेदनशील स्वभावाचा परिचय आला. श्री. जाधव यांनी परभणी जिल्हयातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या ३०० हून अधिक मुला-मुलींची लग्ने लावून ते थांबले नाहीत तर त्यांचे संसार उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे.

यावेळी श्री. कांबळे यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. जाधव यांना दिली. यावेळी श्री.जाधव  यांना महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, दैनिक पुढारीचे दिनेश कांजी, राहुल पारचा, अनिल जोशी यावेळी उपस्थित होते. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना श्री. जाधव  यांनी भेट देऊन चौकशी केली.  

                                                                      000000 

No comments:

Post a Comment