Thursday, 3 March 2016

रॉकेलवरील अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात - गिरीश बापट


नवी दिल्ली, 03: घरगुती इंधनावर मिळणा-या अनुदानाप्रमाणे महाराष्ट्रात लवकरच रॉकेलवर देण्यात येणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिली.  

येथील स्कोप कॉमप्लेक्स मधील मीर्जा गालीब सभागृहाता आयोजितरॉकेलसाठी थेट लाभ हस्तांतरणपरिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी श्री बापट बोलत होते.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय पेट्रोलीयम आणि नैसर्गिक वायु राज्य मंत्री  धमेंद्र प्रधान होते. राज्याचे नागरी पुरवठा विभागाचे संचालक सुभाष लाखे  यावेळी उपस्थित होते.

श्री बापट म्हणाले, ही योजना राज्यातील अमरावती, लातूर, नांदेड, नंदूरबार, गोंदिया, भंडारा या सहा जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम राबविण्यात येणार आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. लाभार्थ्यांनी बाजार भावाप्रमाणे  रॉकेल खरेदी केल्यावर रॉकेलवर देण्यात आलेले अनुदान आणि बाजारभावामधला फरक लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. राज्यातील जवळपास अडीच कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. बॅंकेमध्ये रक्कम जमा करण्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाचा वापर केला जाईल. राज्यात  85 टक्के आधार क्रमांक नोंदणी झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून निधीची आवश्यकता भासणार असल्याचे श्री बापट  म्हणाले.

केंद्र शासनानाची ही योजना लोकोपयोगी असून ख-या लाभार्थ्यांना याचा फायदा होईल. ही योजना कृतीशील असल्याचे सांगत श्री बापट यांनी केंद्रीय मंत्र्यांचे अभिनंदन केले.  

No comments:

Post a Comment