Friday, 4 March 2016

‘सेतु भारतम्‍’ अंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गांवर पुल बांधण्यात येणार

नवी दिल्ली, ०४: सुरक्षित रस्त्यांच्यादृष्टीने आखण्यात आलेल्या ‘सेतु भारतम्‍’ या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी उदघाटन झाले. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील १२ मार्गांसह देशातील २०८ मार्गांवर पुल बांधण्याचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे . या योजनेसाठी ५० हजार ८०० कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्यावतीने आज विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ‘सेतु भारतम्‍’ योजनेचे उदघाटन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्य मंत्री पोना राधाकृष्णन, सचिव संजय मित्रा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष राघव चंद्रा यावेळी उपस्थित होते.

देशातील रस्ते मार्गावरील पुलांचे स्थानांतरण, रूंदीकरण व दुरुस्ती करण्यासाठी १५०० कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. याकामी ३०,००० कोटी रूपये खर्च अपेक्षीत असून ‘सेतु भारतम्’ कार्यक्रमासाठी एकूण ५०,८०० कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतून २०१९ पर्यंत देशातील रस्ते मार्ग व रेल्वे मार्गांवर मोठया प्रमाणात पुल उभारणी करून सामान्य जनतेला सुरक्षीतता प्रदान करण्याचा केंद्र शासनाचा उद्देश आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील पायाभूत सुविधा या शरीरातील धमण्यांप्रमाणे असतात असे सांगून रस्ते विकासासाठी ‘सेतु भारतम्‍’कार्यक्रम महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास व्यक्त केला. कोणत्याही देशाचा विकास हा तेथील मजबूत पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो. आपल्या देशातील पायाभूत सुविधांमधे महत्वाची भूमिका असणा-या रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ‘सेतु भारतम्’ कार्यक्रम तयार केला आहे.
नितीन गडकरी म्हणाले, भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या कोणत्याच योजनेअंतर्गत न येणा-या देशातील २०८ मार्गांवर व रेल्वे मार्गांच्या क्राँसींगवर पुल बांधणे व आवश्यक तिथे भुयारी मार्ग तयार करण्याचे काम या कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा आणि करार येत्या ३ महिन्यात पूर्ण करण्यात येतील, २ वर्षात हा कार्यक्रम पूर्ण करण्याचे ध्येय ठरविण्यात आल्याची माहितीही गडकरी यांनी दिली.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशातील ३३, आसाममधील १२, बिहारमधील २०, छत्तीसगड ५, गुजरातमधील ८, हरियाणातील १०, हिमाचल प्रदेशातील ५, झारखंड मधील ११, कर्नाटकातील १७, केरळातील ४, मध्यप्रदेशातील६, ओडीशातील ४, पंजाबमधील १०, राजस्थानमधील९, तामीळनाडूतील ९, उत्तराखंडमधील २, उत्तरप्रदेशातील ९ आणि पश्चिम बंगालमधील २२ अशा एकूण २०८ मार्गांवर ‘सेतु भारतम’ कार्यक्रमांतर्गंत पुल बांधण्यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील रस्ते होणार सुरक्षित

‘सेतु भारतम्‍’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमात महाराष्ट्रातील १२ मार्गांवर पुल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यानुसार राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्हयाच्या कळमेश्वर भागातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत.

राज्यातील नक्षलग्रस्त व दुर्गम भागात उत्तम व सुरक्षित रस्त्यांची सोय करण्यासाठी या कार्यक्रमात भर देण्यात आला आहे. यानुसार गडचिरोली जिल्हयाच्या मुल भागातील कारंजी-वणी-चंद्रपूर-मुल- या जिल्हयाची सिमा असणा-या सावळी मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत. याच जिल्हयाच्या वडसा भागातील साकोली- लाखंदूर- वडसा-गडचिरोली- चामोर्शी-आष्टी-सिरोंचा मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत.

विदर्भाच्या नागपूर विभागातील उमरेड व भिवापूर आणि चंद्रपूर जिल्हयाच्या नागभीड व ब्रम्हपुरी भागातील चार मार्गांवर पुल बांधण्यासाठी नागपूर-उमरेड-भीवापूर-नागभीड-ब्रह्मपुरी-आरमोरी मार्ग निश्चित करण्यात आला आहे . विदर्भाच्या अमरावती विभागातील वाशिम जिल्हयातील मार्गावर पुल बांधण्यात येणार आहेत. यात अकोला-वाशिम-हिंगोली-नांदेड- देगलूर आणि आंध्र प्रदेशच्या सिमेवरील मार्गावरील पुलांचा समावेश आहे. 
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे व कर्नाटक राज्याला जोडणा-या सोलापूर जिल्हयातही महत्वाच्या मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत. यात सांगोला भागातील रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर या मार्गावर तसेच दुधनी भागातील सोलापूर-अक्कलकोट-दुधनी-चौदापूर-गानगापूर-गुलबर्गा आणि महत्वाच्या सोलापूर –विजापूर मार्गावर पुल बांधण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत राज्याच्या कोकण भागातील रस्ते मार्गांवर पुल बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार रत्नागिरी-सांगोला-मंगळवेढा-सोलापूर मार्गावर पुल बांधण्याचे प्रस्तावीत आहे.

देशातील २०८ मार्गांवर व रेल्वे मार्गांच्या क्राँसींगवर पुल बांधणे व आवश्यक तिथे अंडर ब्रीज बांधण्यासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी २०,८०० कोटी रूपये खर्च अपेक्षीत आहे. २०८ पैकी ७३ मार्गांचे सवीस्तर प्रकल्प अहवाल( डीपीआर) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयास प्राप्त झाले आहेत. यातील उर्वरीत ६४ मार्गांवर पुल उभारणीसाठी मंत्रालयाच्यावतीने आर्थिक वर्ष २०१५-१६ मधे ५६०० कोटी रूपये लवकरच मंजूर होतील .
००००००००




















No comments:

Post a Comment