Tuesday, 8 March 2016

महाराष्ट्रातील ४ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार

 

नवी दिल्ली, ०८: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महाराष्ट्रातील प्रिती पाटकर, ज्योती म्हापसेकर,  सिस्टर लुसी कुरीयन आणि शकुंतला मुजुमदार या महिलांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
            केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल मधे वर्ष २०१५ च्या नारी शक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी, सचिव व्ही सोमसुंदरम यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते देशभरातील १५ महिला व ५ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील चार महिलांचा  यात समावेश आहे.
             पुरस्कार प्राप्त प्रिती पाटकर या सामाजिक व मानवी हक्क कार्यकर्त्या असून त्या प्रेरणा संस्थेच्या सह संस्थापक आहेत. वेश्याव्यवसायात काम करणा-या महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील वेश्या वस्तींमधे गेल्या २८ वर्षांपासून त्या कार्य करीत आहेत. फसवणूक करून  आणल्या जाणा-या निष्पाप मुलींची सुटका करण्याचे उल्लेखनीय काम श्रीमती पाटकर यांनी केले आहे. त्यांनी वेश्या वस्तीत रात्र निवारा केंद्र सुरु केले. वेश्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी संस्थात्मक नोकरी कार्यक्रम आणि शिक्षण पूरक सर्व समावेशी कार्यक्रम राबविला. मानवी तस्करी प्रतिबंधक जाळे निर्माण केले. एड्सबाधितांसाठी पहिला सर्वसमावेशी कार्यक्रम तयार केला. प्रेरणा संस्था ३० हजार वेश्यांच्या कल्याणासाठी कार्य करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून १० हजार मुलींना संरक्षण देण्यात आले. २ हजार २५० मुलींना कायदेशीर मदत देण्यात आली. वेश्यावस्तीतून सुटका करण्यात आलेल्या ७५० महिलांना त्यांनी सहायक सेवा पुरविण्याचे काम केले. प्रेरणा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ५ हजार पोलीस अधिका-यांना आणि ३०० सामाजिक संस्थांना प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०१० मधे अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
ज्योती म्हापसेकर या  पर्यावरण रक्षक कार्यकर्त्या  आहेत. १९७५ पासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या सह संस्थापक आहेत. मुंबई व परिसरातील शहरांमधील कचरा वेचणा-या कामगारांसाठी त्यांनी नाविण्यपूर्ण व्यवसाय प्रारूप तयार करून त्याची प्रभावी अमंलबजावणी केली. ५०हजार कामगारांना त्याचा लाभ झाला. या संस्थेने कचरा वेचणा-या कामगारांसाठी व त्यांच्या कुटुंबांतील मुलींसाठी आरोग्य व शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीमती म्हापसेकर या लेखिका म्हणूनही  परिचित आहेत. त्यांनी महिलांच्या समस्यांवर आधारित अनेक नाटक लिहीली आहेत. मुलांचे शिक्षण, बालकामगार, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या विषयांवरही त्यांनी लेखन केले  आहे.
              सिस्टर ल्युक कुरियन या प्रसिध्द सामाजिक कार्यकर्त्या असून गेल्या १८ वर्षांपासून महिला व बालकल्याणासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. माहेर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरणाचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले आहे. माहेर संस्थेने निराधार महिलांना निवारा व पूर्ण सहाय्य केले आहे. २हजार ६९१ महिलांना त्यांनी निवारा दिला. २ हजार ३३९ महिलांचे पुनर्वसन केले.५९ महिलांची बाल विवाहापासून  सुटका करून त्यांना आधार दिला.  मानसिकरित्या दुर्बल व रस्तोरस्ती भटकंती करणा-या महिलांना या संस्थेने निवारा व वैद्यकीय मदत पुरविली आहे. माहेर संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना प्राथमिक आर्थिक कौशल्य व बचतीचे महत्व पटवून देण्याचे काम करण्यात येते. संस्थेने महाराष्ट्र आणि झारखंडमधे एकूण ५२३ बचतगट स्थापन केले आहेत.  
            पुरस्कार प्राप्त  शकुंतला मुजुमदार या प्राणी मित्र म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांनी दोन दशकांपेक्षा जास्त काळ मुक्या प्राण्यांची सेवा केली. महाराष्ट्र शासनाच्या राज्य प्राणी कल्याण मंडळाच्या संयोजक म्हणून कार्यरत असून त्या ठाणे स्थित  प्राणी कल्याण मंडळाच्या संस्थापक सदस्य व विद्यमान अध्यक्ष आहेत. श्रीमती मुजुमदार या प्राण्यांच्या कल्याणाबाबतच्या कायद्यांच्या दांडग्या अभ्यासक असून  भारत सरकारने देशातील प्राण्यांच्या कल्याणासाठी नेमलेल्या निरिक्षण समितीवर त्यांची नेमणूक केली. त्यांनी प्राण्यांसाठी दक्षता रूग्णालय सुरु केले आहे. दक्ष व समर्पित डॉक्टरर्स व कर्मचा-यांच्या मदतीने अपघात झालेल्या व आजाराने ग्रस्त प्राण्यांवर या रूग्णालयात उपचार करण्यात येतात.
            राष्ट्रपती प्रणब मुखर्जी  आणि केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी यावेळी उपस्थितांना    मार्गदर्शन केले.                                                                    
                                                          00000

No comments:

Post a Comment