Thursday, 12 May 2016

प्रांजल पाटील यांच्या जिद्दीने सर्व भारावून गेले






नवी दिल्ली, १२ : माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मूल्य निर्मितीसाठी असावा आणि आयुष्याच्या शेवटाकडे जाताना सुंदर आयुष्य जगल्याचा आनंद वाटावा, खेदाचा लवलेशही नसावाअसा करारीपणा तर व्यक्ती आणि अधिकारी म्हणून मी, सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत बनण्याचा प्रयत्न करेल हा प्रांजल पाटील यांचा विश्वास बघून उपस्थित भारावून गेले .
निमित्त होते, केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करणा-या महाराष्ट्रातील गुणवंत उमेदवारांचा महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित गुण गौरव समारंभाचे. बीड जिल्हयाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांच्या हस्ते गुणवंतांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
 अधंत्वावर मात करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ७७३ व्या गुणक्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्रांजल पाटील यांचे या कार्यक्रमातील वचन सर्वांसाठी प्रेरणादायी  ठरले. प्रांजल पाटील मुळच्या जळगावच्या असून सध्या दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातूनपश्चिम आशियी देशया विषयावर त्या संशोधन करीत आहेत. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत ८१४ व्या गुणक्रमांकाने उत्तीर्ण झालेले डॉ. किशोर तांदळे आणि ८५१ व्या गुणक्रमांकाने उत्तीर्ण होणारे डॉ. रामदास भिसे यांचाही सन्मान करण्यात आला.
            राजधानीत मराठी मानसांना जोडणारा दुवा म्हणून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात आज हा गुण गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी खासदार डॉ. प्रितम मुंडे आणि आमदार महादेव जाणकर यांचे स्वागत केले . श्री. कांबळे यांनी यावेळी प्रास्ताविक भाषणात या कार्यक्रमाविषयी व यशस्वी उमेदवारांविषयी माहिती दिली. 
                                      रचनात्मक काम करण्यासाठी शुभेच्छा
                                                                   डॉ. मुंडे
यावेळी बोलताना खासदार डॉ. प्रितम मुंडे म्हणाल्या, आजच्या कार्यक्रमात ज्या गुणवंतांचा सन्मान होत आहे त्यांच्या बद्दल अभिमान वाटतो. विशेष करून प्रांजल पाटील जिने अंधत्वावर मात करून समस्त विद्यार्थ्यांसमोर वेगळा आदर्श घालून दिला आहे तिचे विशेष कौतुक वाटते.सध्या राजकारणात आणि प्रशासनात तरूण मोठया प्रमाणात येत आहेत. समाजात प्रशासनाची मोलाची भूमिका लक्षात घेता, प्रशासकीय सेवेत जाणा-या उमेदवारांनी रचनात्मक काम करावे त्यासाठी शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राने राज्य शासनाकडे ठेवलेल्या प्रस्तावास आपले पूर्ण अनुमोदन असून याकामी गोपीनाथ मुंडे फाऊंडेशनच्यावतीने मदत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.     
                         स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ५ लाखाचा निधी देणार
                                                                           महादेव जानकर
स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी आमदार निधीतून ५ लाख रूपयांचा निधी देणार असल्याची घोषणा श्री. महादेव जानकर यांनी यावेळी केली. भारतीय प्रशासकीय सेवेत मराठी तरूणांचा टक्का वाढण्यासाठी या निधीचा मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून समाजसेवेची मोठी संधी तरूणांना उपलब्ध झाली आहे, लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवून या सेवेत येणा-या उमेदवारांनी समाज व देश घडविण्यासाठी मोलाचे योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले.
            यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. किशोर तांदळे  म्हणाले, मला प्रशासकीय सेवेत जायचे आहे त्यासाठी मी अधिक मेहनत करेल. प्रशासकीय सेवेत येऊन तळागाळातील लोकांपर्यत शासनाच्या सेवा व योजना पोहचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी आई, वडील व गुरुजनांना दिले. डॉ. तांदळे हे बीड जिल्हयातील केज येथील रहिवाशी असून औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकीय पदवी संपादन केली आहे.
            डॉ. रामदास भिसे म्हणाले, माझा जन्म व माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण ग्रामीण भागात झाले , आई वडील अशिक्षीत आहेत. १० वी पर्यंत शाळेत पहीला आलो त्यामुळे मी काही तरी वेगळे करेल हा  गावक-यांना विश्वास होता. फलटण येथील  शेती शाळेत उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथील केईएम वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतली. अशिक्षीत असून सदैव प्रोत्साहन देणारे आई वडील आणि शिक्षकांचे सतत मिळत गेलेले मार्गदश हे आपल्या यशाचे गमक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. भिसे हे सोलापूर जिल्हयातील माळशीर येथील रहीवाशी आहेत.
            या कार्यक्रमास दैनिक सामनाचे विशेष प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, दैनिक केसरीचे कमलेश गायकवाड, दैनिक पुढारीचे दिनेश कांजी आणि मी मराठी वृत्त वाहीणीचे मनोज मुंडे, गुणवंत उमेदवारांचे पालक, कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी केले.  
                                         ००००


No comments:

Post a Comment