Wednesday 18 May 2016

दुष्काळ निवारणाच्या पुरवणी प्रस्तावाबाबत केंद्र लवकरच निर्णय घेणार : मुख्यमंत्री फडणवीस

       
नवी दिल्ली, १८ : दुष्काळाग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने पाठविलेल्या पुरवणी प्रस्तावाबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी  दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या १७, अकबर रोड या निवासस्थानी त्यांची भेट घेतलीया भेटीत त्यांनी राज्याच्यावतीने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अतिरीक्त निधी उपलब्ध करून देण्याबाबत पाठविलेल्या पुरवणी मागणी प्रस्तावाबाबतची माहिती श्री राजनाथ सिंह यांना दिली. राजनाथ सिंह हे दुष्काळाला सामोरे जाणा-या राज्यांसाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आहेत. कृषी मंत्रालयाशी समन्वय करून महाराष्ट्राच्या पुरवणी  मागणीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन श्री सिंह यांनी  या बैठकीत दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
 गेल्या आठवडयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्च समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत आढावा घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील दुष्काळाची वाढलेली व्याप्ती पाहता दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुरवणी प्रस्ताव सादर करण्याबाबतची  मागणी केंद्राकडून मान्य करण्यात आली होती. त्यानुसार राज्याने अतिरीक्त निधीची मागणी करणारा पुरवणी प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे.




ईएसआयसीतर्फे चालणा-या रूग्णालयासाठी महामंडळ उभारण्याचा निर्णय घेणार
                                                                      मुख्यमंत्री फडणवीस
 कर्मचारी राज्य विमा मंडळातर्फे चालणा-या रूग्णालयासाठी महाराष्ट्र शासन महामंडळ उभारणार असल्याची माहिती , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
            श्रमशक्ती भवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांची भेट  घेतली. या बैठकीत राज्यात केंद्रीय कर्मचारी राज्य विमा मंडळातर्फे चालविण्यात येणा-या रूग्णालयासाठी महामंडळ उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. राज्यात महामंडळ उभारण्याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालयाच्यावतीने राज्याला निर्देश प्राप्त झाले होते. असे महामंडळ स्थापन केल्यास राज्यात रूग्णालये उभारण्यासाठी केंद्राकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येणार  आहे. यासंदर्भात राज्याच्या कॅबिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाईल असा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 ईएसआयसी योजनेअंतर्गत राज्यात विविध रूगणालयामंध्ये कर्मचा-यांना वैदयकीय सुविधा पुरविण्यात येतात. महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत मोठया प्रमाणात कामगार लाभ घेतात. गेल्या महिनाभर केंद्र आणि राज्य शासनांमधे विविध पातळयांवर या विषयाबाबत चर्चा सुरु होती. आज झालेल्या बैठकीत या बाबत अंतीम चर्चा झाली असून येत्या काही दिवसात राज्य शासन  कर्मचारी विमा मंडळातर्फे चालणा-या रूगणालयासाठी महामंडळ उभारणार आहे.

No comments:

Post a Comment